शिक्षण, सहकार, शेती, सामाजिक व राजकीय क्षेत्रात लोकशिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मृतिस्थळाचे लोकार्पण व पुतळ्याचे अनावरण उद्या, ५ सप्टेंबर रोजी होत आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून होत असलेल्या या कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
डॉ. कदम या लोकशिक्षकाचे ‘लोकतीर्थ’ हे भव्य स्मारक वांगीतील सोनहिरा साखर कारखाना परिसरात उभारण्यात आले आहे. नव्या पिढीला डॉ. कदम यांनी उभ्या केलेल्या संस्थांची माहिती, कार्याची ओळख शिल्प रूपात होईलच, पण डिजिटल संग्रहालयाच्या माध्यमातून देशाचा इतिहास दृष्य रूपात पाहण्याची सुविधाही करण्यात येत आहे. वांगी येथील लोकतीर्थ स्मृतिस्थळ व डॉ. कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर कडेगावमध्ये बयाबाई कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभा होणार आहे. यासाठी दीड लाख लोकांची उपस्थिती राहील, असे गृहीत धरून २० एकर क्षेत्रावर मंडप उभारणी करण्यात आली आहे.या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहतील असे आ. डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य उभारले. समाजकारणाला प्राधान्य देत भारती बँक, सोनहिरा साखर कारखाना, सागरेश्वर व कृष्णा-वेरळा मागासवर्गीय सूतगिरणी आदी संस्थांचे जाळे उभारले. सिंंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाच्या समृद्धीचा मार्ग खुला केला. पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना करून ज्ञानाचा दिवा घरोघरी पोहचविण्याचे काम कदम यांनी केले.