लाडकी बहीण योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून यापुढेही नोंदणी सुरूच राहणार आहे. मात्र यापुढे ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे दिले आहेत. मात्र 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. 1 सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे मिळणार नाही, अशी महत्त्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथील कार्यक्रमात दिली.
4500 रुपये कोणाला मिळणार?
आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 3 हजार रुपये म्हणजेच योजनेचे दोन हप्ते जमा केले आहेत. मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करणे बाकी आहे. ही छाननी 31 ऑगस्टपर्यंत सुरू होती. त्यामुळे आता ज्या महिलांच्या अर्जांची छाननी झाली आहे, अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्यांचे 4500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. मात्र सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळेल मिळणार आहे.
अद्यापही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती. मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका महिन्याने वाढवल्याचे सांगण्यात येत आहे.