मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी पोलिसांना चकवा देणाऱ्या संचालकाला पुण्यात ठोकल्या बेड्या

0
189

राज्यस्थानी मल्टीस्टेटचा संचालक अभिषेक बियाणीला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे ताब्यात घेतले आहे.मागच्या अनेक महिन्यांपासून मल्टिस्टेट प्रकरणातील आरोपी बीडच्या पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होते.अनेक तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.त्याला आता बीड ला घेऊन येणार असून राजस्थानी मल्टीस्टेट च्या प्रकरणातील तपासला आता वेग येणार आहे.

राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणी लातूर,परळी,नांदेड,छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.बीड मधील राजस्थानीसह ज्ञानराधा,जिजाऊ यासह अनेक मल्टीस्टेटमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत.. बीड जिल्ह्यातीलच ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये कुठे होती रुपयांच्या ठेवी अडकल्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णीना पुण्यातून अटक झाली होती. दरम्यान, आज राजस्थानी मल्टीस्टेट संदर्भात पुण्यातूनच अभिषेक बियाणी याला अटक झाली आहे.

नक्की प्रकरण काय?
राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह अख्खं संचालक मंडळच या घोटाळ्यात सामील होते. यात ठेवीदारांचे जवळपास 300 कोटी रुपये बुडवत बीडच्या परळीतील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करत पोबारा केल्याची संतापजनक घटना घडली होती. कष्टाचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्यानं ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातील 17 जणांवर फसवणूकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

बीड जिल्ह्यातील परळीत 142 ठेवीदारांचे 7 कोटी 53 लाख 29 हजार 967 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या मल्टीस्टेट घोटाळयात 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकूण 300 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणात राजस्थान मल्टीस्टेटचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हा शाखेंनं ताब्यात घेतलं आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्यानंतर आता राजस्थान मल्टिस्टेट घोटाळ्याच्या तपासाला वेग येणार असून पतसंस्थांच्या गैरकारभाराला चाप लावणार का?आणि कधी लावणार? असा प्रश्न आता समोर येत आहे.

ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या सुरेश कुटे याची ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीने तीन दिवस चौकशी केल्याची माहिती समोर आली. गत आठवड्यातच ईडीने ज्ञानराधाच्या विविध शाखांवर छापे टाकले होते. सुरेश कुटे याने ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले होते. आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारागृहात जाऊन कुटेला हे पैसे हाँगकाँगला कसे नेले याबाबत माहिती विचारली. या चौकशीला कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे.