कामनाथ नगरमधील नागरी वस्तीमध्ये आढळली 15 फूट लांब जीवंत मगर,पहा व्हिडीओ

0
300

गुजरात राज्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. ज्यामुळे वडोदरा येथे पूर आला आहे. या पुराचा फटका नागरिकांप्रमाणेच वन्य प्राण्यांनाही बसतो आहे. परिणामी येथील कामनाथ नगरमधील  नागरी वस्तीमध्ये गुरुवारी एक 15 फूट लांब मगर (Rescue) पाहायला मिळाली. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे. या पावसाचा फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खास करुन विश्वामित्री नदीला पूर (Vishwamitri River Floods) आला आहे. याच पुरातून मगर नागरी वस्तीत आल्याचे सांगितले जात आहे. नागरी वस्तीत अचानक मगर आढळल्याने नागरिक घाबरले. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने तत्परतेने प्रतिसाद देत, विभागातील स्वयंसेवक घराच्या प्रवेशद्वाराजवळ मगर विसावत असल्याचे शोधण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

विश्वामित्री नदीत मोठ्या प्रमाणावर मगरी
मगर आक्रमक झाल्याने बचाव कार्य आव्हानात्मक होते. दरम्यान, सुमारे एक तासाच्या काळजीपूर्वक प्रयत्नांनंतर, स्वयंसेवकांनी सरपटणाऱ्या प्राण्याला (मगर) सुरक्षितपणे पकडण्यात आणि त्यांचे स्थलांतर करण्यात यश मिळविले. याच घटनेत बुधवारी रात्री उशिरा सामा परिसरातून 11 फूट लांबीच्या आणखी एका मगरीची सुटका करण्यात आली. ही मगर दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर वडोदरातील काही भागांना वेढलेल्या पुराच्या पाण्यात पोहत असताना दिसली. प्राप्त माहितीनुसार, शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीत अंदाजे 300 मगरी आहेत. नुकत्याच आलेल्या पुरामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे अनेक मगरी शहरी भागात प्रवेश करू शकतात. वनविभागाने रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि यापुढे मगरी दिसल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

गुजरात राज्यांमध्ये पाठिमागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अद्यापही पाऊस सुरुच आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सलग चौथ्या दिवशी राज्यात मुसळधार पावसाने पूरग्रस्त भागातून सुमारे 17,800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मृतांमध्ये मोरबी जिल्ह्यातील हलवड तालुक्यातील धवना गावाजवळ रविवारी भरून वाहत असलेला कॉजवे ओलांडताना ट्रॅक्टर ट्रॉली वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्या सात जणांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत.

पहा व्हिडीओ: