सांगलीत तिकीट कुणाला? विधानसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच

0
391

सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळेल असे दावे करायला सुरुवात केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या जोरावर भाजपच्या विरोधात देखील उमेदवार मैदानात उतरवणार आहे.

सांगलीत काँग्रेसचं तिकीट कुणाला? जयश्री पाटील की, पृथ्वीराज पाटील?
सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपण लढवणार आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे उमेदवारीची देखील मागणी केली असल्याचं सांगलीतील महिला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी जाहीर केलं आहे. तसेच, काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं नाही तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जयश्रीताई पाटील यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे सांगलीतील विधानसभा उमेदवारीच्या जागेवरुन रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे देखील काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक असून मागील विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांचा थोडक्या मतात पराभव झाला होता.

दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांना पराभूत करून या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. मिरजमधून शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी आपल्याला उद्धव ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी निश्चितपणे मिळणार असल्याचा दावा केला आहे.