‘छावा’चा हा ॲक्शनपॅक्ड टिझर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. आजवर संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या कहाण्या या टिझरच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर जिवंत होताना दिसत आहेत. अभिनेता विकी कौशल ‘छावा’मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा टिझर पाहता विकी या भूमिकेत एकदम परफेक्ट वाटत आहे. छावाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासून विकी कौशलचा लूक, ट्रेलरमध्ये दिसणारे युद्धाचे कमाल प्रसंग या सगळ्याची जोरदार चर्चा आहे.
आता छत्रपती संभाजी महाराज महाराज म्हटले की, ओघाने स्वराज्याचा शत्रू औरंगजेबही आलाच. ‘छावा’च्या टिझरमध्ये (Chhava) औरंगजेबाचीही झलक पाहायला मिळत आहे. ‘सिवा गया, पर अपनी सोच जिंदा छोड गया’ असा डायलॉग औरंगजेबाचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या तोंडी आहे. सुरुवातीला या ॲक्शनपॅक्ड टिझरमधील विकीच्या दिसण्याचीच जोरदार चर्चा होती. मात्र, या टिझरमध्ये औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत दिसणारा अभिनेता कोण आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. अनेकांनी याचा शोध घेतला. तेव्हा औरंगजेबाची भूमिका साकारणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अक्षय खन्ना (Akshay Khanna) असल्याचे समोर आले आहे.
औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्ना अजिबात ओळखू येत नाही. त्यामुळे टिझरमध्ये दिसणारा वृद्ध औरंगजेब म्हणजे अक्षय खन्ना आहे, यावर सुरुवातीला अनेकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र, काहीवेळानंतर औरंगजेब म्हणजे अक्षय खन्नाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता ‘छावा’मधील विकी कौशलच्या लूकबरोबर अक्षय खन्नाच्या कमाल ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा रंगली आहे. वृद्ध औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्ना हा कमालीचा वेगळा दिसत आहे. ‘सिवा गया, पर अपनी सोच जिंदा छोड गया’ या एका डायलॉगने अक्षय खन्नाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता छावा चित्रपटात विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.
छावा हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते, दिव्या दत्ता ही सोयराबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका मंदाना ही येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय, अभिनेता संतोष जुवेकरही या चित्रपटात दिसणार आहे.
पहा व्हिडीओ:
instagram.com/reel/C-1v4aFSluO