जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’आणि सन्मानचिन्ह जाहीर

0
116

 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. अनुराधा पौडवाल यांना यंदा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यासोबतच अन्य 12 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी केली आहे. अनुराधा पौडवाल यांच्यासोबतच यंदा ‘भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2024 मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे.

शुभदा दादरकर यांना यंदाचा ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४’जाहीर झाला आहे. त्यांना संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल २०२४चा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३’साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली आहे .

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ हा 10 लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र दिले जाणार आहे. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजाने अनेक हिंदी,मराठी गाणी सदाबहार झाली आहेत. अनुराधा पौडवाल या दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल यांच्या पत्नी आहेत. त्यांची संगीत क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख आहे. यापूर्वी त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.