‘बांगलादेशात अडकलेले भारतीय विद्यार्थी, अभियंते विशेष विमानांद्वारे परत आणले जाईल’- एकनाथ शिंदे

0
137

बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे तणावाची परिस्थिती आहे. अशात माजी पंतप्रधान शेख हसीना या देश सोडून निघून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी हिंसाच व जाळपोळ सुरु आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह अनेक लोक बांगलादेशमध्ये अडकले आहेत, आता त्यांच्याबद्दल एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे. हिंसाचारग्रस्त बांगलादेशमध्ये अडकलेल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष टीम तयार केली आहे.

बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते आणि इतरांना मदत करण्यासह त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील, यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह अभियंते आणि इतरांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. बांगलादेशातील बाधित देशवासीयांना परत आणण्याच्या कार्यवाहीसाठी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी दिली. बांगलादेशातील भारतीय दूतावासामार्फतही आवश्यक त्या सर्व उपयोजना करण्यात येत आहेत. तिथे अडकलेल्या देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांस, अभियंते किंवा इतर भारतीयास हानी पोहोचणार नाही आणि त्यांना सुरक्षितरित्या मायदेशात परत आणण्यात येईल. तिथे अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभियंते यांनाही तातडीने सुरक्षितपणे परत आणण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना संपर्क साधणे, मदत उपलब्ध करून देणे यासंदर्भातील कार्यवाहीसाठी राज्यात एक पथकही नियुक्त करण्यात आले आहे. राज्यातील या बाधितांना जलद गतीने मायदेशात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या चर्चेदरम्यान सांगितले.

पहा पोस्ट-