देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी कोणी लागलं तर मी सोडत नाही. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागूनच दाखवावे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीसांना आव्हान दिले. फडणवीस आमच्या नादी लागणार म्हणजे काय करणार, पोलिसांना, ईडी किंवा सीबीआयला आमच्या मागे लागणार. फडणवीसांना कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका. लोकसभा निवडणुकीत ते आमच्या नादी लागले आणि त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा आमच्या नादी लागावेच, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. देवेंद्र फडणवीस नामर्द, लफंगे आणि लोकांची टोळी घेऊन आमच्या नादी लागणार आहेत का? तुमच्याकडे तेवढी छाती आणि हिंमत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर ईडी आणि सीबीआयची कवचकुंडलं बाजूला ठेवून लढा आम्ही तुम्हाला 20 फूट खाली गाडल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी सुरु करण्यात आलेल्या “ताई, माई, अक्का” या मोहिमेविषयी विचारण्यात आले. तेव्हा संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचताना अत्यंत शेलकी भाषा वापरली. जर मी म्हणालो की ताई माई अक्का माझा पक्ष *क्का, असे मी बोललो तर चालेल का? पण मी तसे बोलणार नाही, असे राऊतांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस क्रूर, अनितीमान आणि भ्रष्ट माणूस: संजय राऊत
महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या राजकारणात एका संस्कृतीचे पालन केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी लफंग्या टोळीला हाताशी धरुण दळभद्री राजकारण सुरु केले. त्यामुळे आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी, एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तलवार उपसली आहे. ते फडणवीसांना तुम्ही नाही तर तू असे एकेरीत बोलले. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या विचारांचे आहेत. पण त्यांनी आजपर्यंत कोणती संस्कृती, कोणते नीतीनियम पाळले? जे संघाला नीतिमान आणि प्रखर राष्ट्रवादी मानतात त्यांना मी देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण देतो. माणूस किती क्रूर, भ्रष्ट आणि अनितीमान असतो, हे फडणवीसांकडे पाहून कळते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कपटी आणि कारस्थानी लोकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदनाम झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याविषयी विचारले असता राऊतांनी त्यावर फारसे बोलणे टाळले. देवेंद्र फडणवीस यांना भाजपने आंतरराष्ट्रीय अध्यक्ष करावे. त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.