राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या आता परत येऊन आग विझविणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या तयारीत, त्याला घेऊ नका, असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी करत अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अशातच अता उत्तम जानकरांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. बिबट्या म्हणून उत्तम जानकरांनी त्यांनी सिद्ध केलं की, अजित पवार वाघ आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. तसेच, थोबाड आवरावं असं म्हणत मिटकरींनी जानकरांना फटकारलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, “राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तम जानकरांना चांगलंचं फटकारलं आहे. तसेच, कडक शब्दांत ‘थोबाड़ आवारावं’ असा इशारा दिला आहे. दरम्यान, माळशिरसचे माजी आमदार हनुमंत डोळस यांनी उत्तम जानकर यांच्याविरुद्ध एक लक्षवेधी लावली होती. लक्षवेधीवर उत्तर देताना तात्कालीन धर्मदाय आयुक्तांनी कागदपत्र सादर केले. त्यावर तत्कालीन गृहमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलं होतं. म्हणजेच, हनुमंत डोळस यांनी उत्तम जानकरांना त्यांची जागा दाखवली आहे. आज तोच व्यक्ति अजित पवारांवर टिका करतोय, बिबट्या म्हणून त्यांनी सिद्ध केलं की अजित पवार हे वाघ आहेत.”
काय म्हणाले उत्तम जानकर?
काही दिवसांपूर्वी भाजपच्या अजगराचा विळखा देशाला आणि राज्याला पडला होता. कोणीही उघड बाहेर पडायला तयार नव्हतं. जंगलाला आग लागल्यावर आपला बिबट्याही 40 जणांना घेऊन पळून गेला होता. मात्र यावेळी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चिमणी बनून आपल्या चोचित थेंब थेंब पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि मतदारांनी मतांचा पाऊस पडल्यानं ही आग विझली. आता हाच बिबट्या पुन्हा शिकारीला बाहेर पडायच्या तयारीत आहे. इकडे येऊन याच चिमण्यांची शिकार करणार असल्यानं त्याला येऊ देऊ नका, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय सेलच्या कार्यक्रमात जानकर यांनी अजित पवार यांच्या प्रवेशाला विरोध करताना जोरदार टोलेबाजी केली.
आजही उत्तम जानकर हे अधिकृतपणे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीत असले तरी संपूर्ण लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजितदादा यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत बारामतीमध्ये देखील जोरदार प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपनं याच जानकर यांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी खास विमानाच्या वाऱ्या देखील घडवल्या. मात्र तरीही जानकर यांनी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत लोकसभेत राष्ट्रवादीच्या विजयात मोठा हातभार लावला होता. आता पुन्हा अजितदादा यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाल्यावर अस्वस्थ झालेल्या जानकरांनी पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा एकदा थेट अजितदादा यांच्यावर निशाणा साधला. त्यांना पक्षात घेतलं तर, प्रामाणिकपणे पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असे संकेत उत्तम जानकरांनी दिले आहेत. त्यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसादही दिल्याचं पाहायला मिळणार आहे.