दिल्लीच्या आयएएस कोचिंग सेंटर मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेकडून बुलडोझर कारवाई; संबंधित अधिकारी निलंबित

0
134

 

दिल्लीच्या आयएएस कोचिंग सेंटर मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर दिल्ली महापालिकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एमसीडी कोचिंग सेंटरच्या बाहेर बुलडोझर चालवत आहे. ड्रेनेज सिस्टीम झाकून संस्थेच्या बाहेर उभारण्यात आलेला फूटपाथ बुलडोझरने पाडण्यात येत आहे. तसेच येथील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. या दुर्घटनेनंतर दिल्ली महानगरपालिकेचे आयुक्त अश्वनी कुमार यांनी स्थानिक JE आणि AE ला निलंबित केले आहे. दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांवर महापालिकेची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. जुन्या राजिंदर नगर घटनेत दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. यापूर्वी दोन जणांना अटक करण्यात आली होती. तथापी आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आणखी पाच जणांना अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, घटनास्थळी पोहोचलेल्या जेसीबीने झाकलेल्या नाल्याचा स्लॅब काढण्यात येत आहे. घटनास्थळी तीन जेसीबी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. राव कोचिंग सेंटरसमोरील नाल्यातून अतिक्रमण काढण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी आणखी पाच आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इमारतीच्या चार मालकांचा समावेश आहे. सरबजीत सिंग, तेजिंदर सिंग, हरविंदर सिंग आणि परविंदर सिंग असे या चार मालकांची नावे आहेत. चौघेही चुलत भाऊ आहेत. हे लोक करोलबागमध्ये राहतात. त्यांनी राव आयएएस कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता यांना इमारतीचे तळघर 4 लाख रुपये मासिक भाड्यावर दिला होते.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना डीसीपी सेंट्रल एम हर्षवर्धन यांनी पुष्टी केली की, या प्रकरणात आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या सात झाली आहे. अटक केलेल्यांमध्ये तळघर मालक आणि इमारतीच्या गेटचे नुकसान करून वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा समावेश आहे. डीसीपी एम हर्षवर्धन यांनी एएनआयला सांगितले की, या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. आम्ही या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करत आहोत आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखत आहोत.

पहा व्हिडीओ: