टोमॅटोच्या दरात मोठी वाढ! ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कमी दरात टोमॅटोची विक्री सुरु करण्याचा निर्णय

0
1020

सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होत आहे. मात्र, ग्राहकांना वाढत्या दराचा फटका बसत आहे. सध्या टोमॅटोचे दर हे 80 ते 100 रुपये किलोवर पोहोचले आहेत. अशातच सरकारनं ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कमी दरात टोमॅटोची विक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाने (NCCF) कमी दरात टोमॅटो विक्रीचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून दिल्ली एनसीआरमध्ये 60 रुपये किलो दराने टोमॅटो विकण्याचा निर्णय घेतला आहे.

पावसामुळ टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 27 जुलै रोजी दिल्लीत टोमॅटोची किरकोळ किंमत 77 रुपये प्रति किलो होती. गुणवत्तेनुसार आणि स्थानानुसार, काही भागात दर 80 रुपये किलोपेक्षा जास्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक भागात मुसळधार पावसामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुरवठा वेळेवर न झाल्याने दिल्ली एनसीआरमध्ये टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला. याशिवाय पावसामुळे टोमॅटोची नासाडीही वाढत आहे, त्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे.

दिल्लीसह नोएडा आणि गुरुग्राममध्येही विक्री होणार
NCCF ने दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो विक्रीचा मेगा सेल 29 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. हळूहळू दिल्ली एनसीआरच्या सर्व भागात टोमॅटोची विक्री सुरु केली जाणार आहे. टोमॅटोची सबसिडी विक्री सध्या कृषी भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी कॉलनी, हौज खास, पार्लमेंट स्ट्रीट, आयएनए मार्केट आणि नोएडा, रोहिणी आणि गुरुग्राममधील अनेक भागात होणार आहे. या विक्रीच्या मदतीने आम्ही बाजारातील वाढत्या टोमॅटोच्या किमती थांबवू इच्छितो. याशिवाय ग्राहकांनाही फायदा होणार आहे.

ग्राहकांना दिलासा देण्यासाठी NCCF ने घेतला निर्णय
एनसीसीएफच्या मते टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सरकार चिंतेत आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही कमी दरात टोमॅटोची विक्री करत असल्याचे NCCF ने सांगितले. विविध कारणांमुळं वाढलेल्या किमतींचा दबाव ग्राहकांवर पडू नये, यासाठी आमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी याच काळात टोमॅटोचे भाव 165 रुपये किलोवर पोहोचले होते. यंदा टोमॅटोचे दर जवळपास निम्मे आहेत.

टोमॅटोबरोबर बटाटे आणि कांद्याच्या किंमतीतही वाढ
टोमॅटोचे भाव वाढण्यास प्रतिकूल हवामान जबाबदार धरले जात आहे. उष्णतेच्या लाटेनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे भाव वाढत आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातून किरकोळ बाजारात टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव झपाट्याने वाढत आहेत. प्रतिकूल हवामानामुळे टोमॅटो व्यतिरिक्त दिल्लीत बटाटे आणि कांद्याच्या किमतीही वाढत आहेत. दरवर्षी या महिन्यांत टोमॅटोच्या दरात वाढ होत असते.