पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज (25 जुलै) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार तसेच एच. के. पाटील यांची भेट घेतली. महापुराची परिस्थिती उद्भवू नये, या पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी विनंती सतेज पाटील यांनी निवेदनातून केली.
सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिला. अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही परस्पर सहकार्याने काम करत आहोत, असे एच. के. पाटील यांनी सांगितले.
पंचगंगा नदी धोका पातळीवर, राधानगरी धरण भरले
दरम्यान, पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने महापुराची भीती वाढली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाण्यची पातळी 43 फूट 2 इंचांवर पोहोचली आहे. राधानगरी धरण सुद्धा 100 टक्के भरलं असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे भोगावती नदी पात्रात 7 हजार 212 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पावसाची उघडझाप सुरु असली, तरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कायम आहे. जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे
राधानगरी 8.21 टीएमसी, तुळशी 2.93 टीएमसी, वारणा 29.96 टीएमसी, दूधगंगा 18.94 टीएमसी, कासारी 2.08 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.01 टीएमसी, पाटगाव 3.39 टीएमसी, चिकोत्रा 1.01 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.