देशात गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून तब्बल 73 हजारांपर्यंत सोनं पोहोचलं आहे. त्यामुळे, यंदाच्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागले होते. अखेर, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोनं-चांदीच्या दरातही मोठी कपात या बजेटमधील निर्णयामुळे झाली आहे. जळगावच्या (Jalgaon) आणि पुण्याच्या (Pune) सराफ बाजारात याचा परिणाम दिसून आला. कारण, सोनं (Gold) खरेदीसाठी दुकाना गर्दी केलेल्या महिला व ग्राहकांना 2 तासांतच प्रति तोळा सोन्यामागे 3 हजार रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे, सोनं खरेदीसाठी आलेल्या या सर्वच ग्राहकांनी बजेटवर समाधान व्यक्त केलं आहे. बजेट जाहीर होताच 3 हजारांनी सोन्याचा दर घटल्याचं रांका ज्वेलर्सच्या फत्तेचंद रांका यांनी सांगितला. त्यामुळे, बजेटनंतर सोनं खरेदी करताना ग्राहकांची चांदी झालीय.
केंद्राने सादर केलेल्या अर्थ संकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीत दिसून आला. कारण, सोन्याच्या दरात अवघ्या दोन तासात 3 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सोनं हा गरीब असो, वा श्रीमंत, प्रत्येकाच्या जीवनातील निगडीत घटक आहे. सौभाग्याचं लेणं म्हणून मनी मंगळपुत्र तरी प्रत्येक महिला भगिनींना करावंच लागतं. त्यात, लगीनसराईत सोनं खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या असतात. त्यामुळेच, सोन्याच्या दरात होणारी वाढ किंवा कपात ही सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची ठरते. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात घोषणा करताच इकडे गावाकडेही सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची कपात झाली आहे.
सितारमण यांनी आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीच्या दराबाबत खुशखबर मिळाली आहे. सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. याआधी सोने-चांदीचे सीम शल्क 15 टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता या मौल्यवान धातूंची किंमतही कमी झाली असून प्रतितोळा सोन्यामागे तब्बल 2 हजार रुपयांची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नेमका काय बदल झाला?
सोने, चांदीवरील सीमा शुल्क – 6 टक्के
प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के
अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.
नव्या कररचनेत नवं काय?
स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरुन 75 हजारांवर
3 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री
3 ते 7 लाख उत्पन्न – 5 टक्के आयकर
7 ते 10 लाख उत्पन्न- 10 टक्के आयकर
10 ते 12 लाख उत्पन्न – 15 टक्के आयकर
12 ते 15 लाख उत्पन्न – 20 टक्के आयकर
15 लाखांवर उत्पन्न – 30 टक्के आयकर