माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र शासनाचा ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या माध्यमातून खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ आज शुक्रवार, दिनांक १९ रोजी सकाळी नऊ वाजता आटपाडी पोलीस स्टेशन चौक येथे होणार असल्याची माहिती माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी दिली.
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी महिला भगिनींच्या अडचणी समजून घेत ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरणे व स्वीकारण्यासाठी घेतलेला पुढाकाराने खानापूर विधानसभा मतदार संघातील महिला वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी अनेक तज्ञ व्यक्तींची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाच्या माध्यमातून महिलांना आपले अर्ज भरणे सोपे करण्यात आले आहे.
प्रत्येक गावातून लाऊड स्पीकर गाडीला लावून या योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी पात्र महिला भगिनींच्या कडून अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज शासन दरबारी पोहच करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरण्यास महिलांच्या मध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले होते. अर्ज कोठे करायचा? कसा भरायचा? त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबत नेमकी माहिती नसल्याने अनेक उलट सुलट घटना घडल्या होत्या. या घटनांना छेद देण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केले आहे.
यासाठी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आटपाडी पोलीस स्टेशन चौक येथे या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरून घेण्याचे शुभारंभ करण्यात येणार आहे. पुढील पंधरा दिवस या योजनेचे अर्ज खानापूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात मेळावा आयोजित करत भरून घेतले जाणार आहेत. याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास थेट संपर्क साधण्याचा आवाहन ब्रम्हानंद पडळकर यांनी महिला भगिनींना केले आहे.