वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होते. रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महाडमधील हिरकणवाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमधून त्यांना अटक केली गेली. पुणे पौड पोलीस त्यांना घेऊन पुण्याकडे निघाले आहेत. त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या. पूजा खेडकर यांचेही प्रशिक्षण थांबवून त्यांना मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री नॅशनल एकेडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशनमध्ये तातडीने परत बोलवले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आएएस पूजा खेडकर यांचे संपूर्ण कुटुंबच वादात आले आहे. पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाल्यानंतर त्यांच्या आई अन् वडिलांचे कारनामे समोर आले. पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि इतरांवर शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय होते प्रकरण
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर वादाची जमीन खरेदी घेतली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होते. वर्षभरापूर्वीच्या या प्रकाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.