आयएएस ऑफिसर पूजा खेडकर च्या पुण्यातील घराबाहेर लावली कारणे दाखवा नोटीस

0
216

पुणे पोलिस कमिशनर अमितेश कुमार  यांनी पुण्यातील आयएएस ऑफिसर पूजा खेडकरच्या घराबाहेर कारणे दाखवा नोटीस चिकटवली आहे. ही नोटीस पूजा यांची आई मनोरमा खेडकरांसाठी आहे. त्यांच्याकडून नोटीस स्वीकारायला कुणीच पुढे न आल्याने अखेर पुणे पोलिसांना त्यांच्या घराबाहेर नोटीस चिकटवावी लागली आहे. मनोरमा यांचं गन लायसंस का रद्द केले जाऊ नये? अशी त्यामध्ये विचारणा करण्यात आली आहे.

 

मनोरमा खेडकर यांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.पुणे ग्रामीण पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांच्या विरूद्ध आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका शेतकर्‍याने मनोरमा यांच्याविरूद्ध धमकावल्याचा आरोप केला आहे. दरम्यान मनोरमा यांचा हातात गन घेतल्याचा आणि अरेरावीची भाषा केल्याचा एक व्हिडिओ वायरल होत आहे. तसेच बाणेरच्या घरी पोलिस पोहचले असता त्यांनी दार उघडण्यास नकार दिला होता. उलट पोलिसांविरूद्ध त्या आवाज चढवून बोलत असल्याचं पहायला मिळालं आहे.

 

 

पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस ऑफिसर आहे. काही दिवसांपूर्वी खाजगी गाडी वर लाल-निळा दिवा लावणं, फॅन्सी नंबरप्लेट वापरणं यावरून त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर प्रशिक्षणार्थी काळामध्ये सरंजामी थाट दाखवणं त्यांना भोवलं आहे. त्यांची पुण्यामधून आता वाशिम मध्ये बदली करण्यात आली आहे.दरम्यान पूजा खेडकर यांनी आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.