मुंबईत मगरीच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला अटक

0
52

मुंबईतील पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला वन विभागाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी अटक केली. दरम्यान, आरोपीने तस्करी केलेले मगरीचे पिल्लू आयआयटी पवई परिसरात विक्रीसाठी आणले होते.

पवई तलावात मगरींचा अधिवास असून अनेकदा मोठ्या मगरी पवई तलावातून विहार तलावाकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. एक व्यक्ती बुधवारी मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी या परिसरात येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयआयटी पवईच्या प्रवेशद्वारासमोर जोगेश्वरी जोडरस्त्यावर वन विभागाने सापळा रचला होता. संशयास्पद व्यक्ती दिसताच वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मगरीचे पिल्लू सापडले. वन विभागाने आरोपीविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बुधवार, १० जुलै रोजी गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. वन विभागाला आरोपीची दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे. मगर वन्यजीव अधिनियम १९७२ अधिसूची १ मध्ये असून मगरीच्या तस्करीप्रकरणी ३ ते ७ वर्ष कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे.

ठाणे येथील वन विभागातील उप वन संरक्षक संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वनसंरक्षक ठाणे सोनल वळवी, वेनक्षेत्रपाल मुंबई राकेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रोहीत मोहिते मानद वन्यजीव रक्षक ठाणे , वनपाल मुलुंड संदीप यमगर, वन संरक्षक भांडुप मिताली महाले आणि वन रक्षक राम केंद्रे आदी सहभागी होते.

दरम्यान, अनेक वेळा मोठ्या मगरी पवई तलावातून विहार तलावाकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्त्यावरील वाहतुकीमुळे होणारे ध्वनी प्रदुषण आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे मगरींना त्रास होतो.