विद्येचे माहेरघर असलेले पुणे सध्या वेगळ्याच घटनांमुळे गाजत आहे. पोर्श कार अपघात, पबमध्ये ड्र्ग्सचा वापर, या सगळ्या घटनांमुळे पुण्याची चर्चा होत असतानाच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घ़डली आहे. शहारतील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल रात्री 8 च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपीला रोखलं आणि त्या महिला पोलिसाला वाचवल्याने मोठा अनर्थ टळला.
याप्रकरणी आरोपी संजय फकिरा साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मद्यपान करून नशेत धुंद असलेल्या आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपी संजय हा पिंपरी-चिंचवड येथे राहणारा असून त्याचं मूळ गाव हे जालना असल्याचं समजतं. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात सुरू होती कारवाई, तेवढ्यात…
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. तेथे ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात कारवाई सुरू होती. तेव्हा महिला पोलिसाने तेथे संजय याला अडवलं आणि त्याची चौकशी सुरू केली. मात्र तेवढ्यात त्याने महिला पोलिसावर पेट्रोल आणि रॉकेल टाकत तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा तिथे इतर पोलिस गस्तीला होते. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि सतर्कतने धाव घेत त्या आरोपीला रोखले आणि महिला पोलिसालाही वाचवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि महिला पोलिसाचाही जीव वाचला.
आरोपी संजय फकिरा साळवे याला पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. शहरात सध्या सर्वत्र ड्रिंक अँड ड्राइव्हविरोधात कारवाई सुरू असतानाच पोलिसांवर असा हल्ला झाल्याने एकच खळबळ माजली आहे.