सांगलीतील दोन जागांसाठी भाजपकडे ‘हा’ मित्रपक्ष करणार मागणी

0
79

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीत सर्वाधिक जागा भाजपनं लढवल्या होत्या. भाजपला महाराष्ट्रातील छोट्या मित्रपक्षांनी प्रत्यक्ष उमेदवार निवडणुकीत न उतरवता पाठिंबा दिला होता. भाजपनं 28 जागा लढवल्या त्यापैकी 9 जागांवर विजय मिळवला. भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मित्रपक्षांना सोबत घेत विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं सांगलीतील दोन जागांची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. ही मागणी करणार असल्याचं जनसुराज्यचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी म्हटलंय. तर, विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख आहेत. आता भाजप समित कदम यांच्या मागणीवर काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.

जनसुराज्य शक्ती पार्टी मिरज, जत विधानसभेच्या जागेची भाजपकडे मागणी करणार असल्याची माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केली आहे. विशेष म्हणजे मिरज मतदारसंघात विद्यमान मंत्री सुरेश खाडे आमदार आहेत. त्यामुळं मिरज विधानसभेच्या जागेवरून महायुतीतही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील जत व मिरज विधानसभेच्या जागेची भाजपकडे मागणी करणार असल्याचे जनसुराज शक्ती समित कदम पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी जाहीर केले. मिरजेत शिवसेना (शिंदेसेना) व पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत आता जनसुराज्य या मित्रपक्षानेही मिरज विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे. याशिवाय मिरज मतदारसंघाचे आमदार भाजपचे मंत्री सुरेश खाडे आहेत. त्यामुळं महायुतीत मिरजेच्या जागेवरुन मविआ बरोबरच महायुतीत देखील उमेदवारी साठी रस्सीखेच होणार असे दिसतेय.

लोकसभा निवडणुकीत जन सुराज्य शक्ती पक्षाने भाजपला सहकार्य केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांना विनय कोरे यांच्या मतदारसंघातून लीड मिळालं असल्याचं देखील समित कदम यांनी म्हटलं आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील विधानसभेच्या जागांची भाजपकडे मागणी करणार आहे. लोकसभा निवडणुकीत काय चुकले, याचे चिंतन सुरू असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी या गोष्टी दुरुस्त केल्या जातील. मिरज विधानसभेची जागा भाजपने दिल्यास जनसुराज्य शक्ती पक्षाचा उमेदवारही तयार आहे, असंही समित कदम यांनी म्हटलंय.

भाजप जागा सोडणार का?
भाजपसोबत यावेळी महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आहेत. याशिवाय छोटे पक्ष देखील आहेत. यामध्ये रासप, आरपीआय, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य शक्ती पार्टी असे पक्ष आहेत. त्यामुळं मित्रपक्षांना किती जागा सोडल्या जाणार हे पाहावं लागेल.