ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार, सर्वपक्षीय बैठकीत नेते काय बोलणार? 29 जूनला मुंबईत महत्त्वाची बैठक

0
5

 

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यामुळे राज्य सरकार सध्या कोंडीत सापडले आहे. हा सगळा तिढा सोडवण्यासाठी 29 जून म्हणजे शनिवारी राज्य सरकारकडून मुंबईत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले जाणार आहे. याशिवाय, राज्यातील ओबीसी नेते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीसाठी पाचारण केले जाणार आहे. त्यामुळे 29 जूनच्या बैठकीत ओबीसी नेते काय बोलणार आणि राज्य सरकार त्यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथील प्राणांतिक उपोषणावेळी ओबीसी प्रवर्गातून इतर कोणालाही आरक्षण दिले जाणार नाही, याची लेखी हमी सरकारे द्यावी, अशी मागणी केली होती. ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीसंदर्भातही यावेळी चर्चा केली जाऊ शकते. त्यांच्या या मागणीवर 29 जूनच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवून देणार, असा पण केला आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील 13 जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होऊ शकते.

यापूर्वी राज्यात मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाले होते तेव्हा राज्य सरकारने अशाचप्रकारे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर राज्यातील वातावरण काहीप्रमाणात निवळले होते.

बीडमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण, संपूर्ण स्टाफने मूकमोर्चा काढला
बीड जिल्ह्यात एका इंडिया बँकेच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. याविरोधात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पहाटे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मूक मोर्चा काढला होता. यावेळी इंडिया बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. तीन दिवसांपासून तक्रार दाखल होऊनही पोलिसांनी हल्लेखोराला अटक का केली नाही? असा सवाल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विचारला. तसेच बँकेच्या काही कर्मचाऱ्यांवर राजकीय नेत्यांकडून दबाव येत असल्याची तक्रारही आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेला तणाव कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धनगर समाजाच्या मागण्यांसाठी आज दुपारी बैठक
धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधीमंडळात होणार बैठक. चौंडी येथील उपोषणकर्त्यांसोबत सरकार करणार चर्चा. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी बोलावली तातडीची बैठक. आज दुपारी अतुल सावेंच्या दालनात दुपारी २ वाजता बैठक होईल. ओबीसी मंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राहणार उपस्थित. धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या यशवंत सेनेच्या प्रतिनिधींना चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे.