तुम्ही तुमच्या कारमध्ये प्रवेश करताच एसी चालू करता का? यामुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, जाणून घ्या…

0
10

उन्हाळ्याच्या दिवसात एसीचा वापर वाढतो. उन्हाळ्यात एसीशिवाय कारने प्रवास करणं कठीण होतं. अनेक जण उन्हाळ्यात एसीशिवाय प्रवास करण्याचा विचारही करत नाही. उन्हाच्या झळांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी अनेक जण कारमध्ये बसताच एसी सुरू करतात. ज्या लोकांना उष्णतेचा जास्त त्रास होतो, ते आधी कार सुरू करतात, त्यानंतर एसी सुरू करतात आणि काही वेळाने कारमधील वातावरण थंड झाल्यानंतर ते कारमध्ये बसतात; तर काही जण कार सुरू करताच एसी चालू करतात. मात्र, काही जण असे आहेत जे गाडी सुरू केल्यानंतर काही वेळ एसीशिवाय गाडी चालवतात आणि नंतर AC ऑन करतात.

ज्याप्रमाणे लोकं घरात एसी लावताना काही गोष्टींची काळजी घेतात, त्याचप्रमाणे कारमध्ये एसी वापरण्याचीदेखील योग्य पद्धत असते. तुम्ही तुमच्या कारमध्ये प्रवेश करताच एसी चालू करता का? यामुळे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, या विषयावर बेंगळुरू येथील इंटर्नल मेडिसिन, ॲस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटलचे डॉ. बसवराज एस. कुंबर यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण सविस्तर जाणून घेऊ…

डॉ. कुंबर सांगतात, “जेव्हा तुम्ही तुमची कार बाहेर सूर्यप्रकाशात पार्क करता आणि थोड्या वेळाने तुम्ही जेव्हा कारच्या आत प्रवेश करता, तेव्हा उष्णतेमुळे तुम्ही लगेच तुमच्या गाडीतील एसी सुरू करता, पण असे अजिबात करू नका. तुमच्या कारमधील तापमान तुमच्या फुफ्फुसाच्या (आणि शरीराच्या) नियमित तापमानापेक्षा जास्त असते आणि त्यामुळे तुमची फुफ्फुसे कोरडी होऊ शकतात.

कारमधील हवा केवळ कोरडीच नाही तर धुळीने भरलेली आहे. एसी व्हेंट नियमितपणे साफ न केल्यास, धूळ साचण्याची शक्यता वाढते आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला तीव्र वास येऊ शकतो. अशा दूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने शिंका येणे, ॲलर्जी, नाक व घसा कोरडा पडणे आणि दमा आणि ब्राँकायटिस यांसारख्या दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात, असे डॉक्टर सांगतात.

डॉ. कुंबर यांनी नमूद केले की, वाहनातील हवेची गुणवत्ता तुम्ही वापरत असलेल्या कारच्या ब्रँडवरही अवलंबून असते. “प्रीमियम वाहनांमध्ये क्लिनर व्हेंट्स आणि धूळ तिरस्करणीय तंत्रज्ञान असतात, तथापि नियमित मॉडेल्समध्ये एअर कंडिशनर चालू केल्यानंतर रसायने सोडण्याचा धोका असतो. यासाठी उपाय म्हणून कारमध्ये लगेच बसल्यावर एसी सुरू करू नका. आधी तुमच्या कारच्या खिडक्या खाली करण्याचा प्रयत्न करा आणि आतील तापमान थंड होण्यासाठी आणि सामान्य होण्यासाठी पाच मिनिटे प्रतीक्षा करा, मग एसी चालू करा, अशी डॉ. कुंबर यांनी शिफारस केली.