ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. ते 35 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी राज्यभरातील शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांची सतत रीघ लागली आहे. यावेळी मुस्लीम समाजाचे एक शिष्टमंडळही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांच्या अंगावर भगवी शाल घातली. याशिवाय, मुस्लीम बांधवांनी आदित्य यांना एक तलवारही भेट दिली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विशेषत: मुंबईत मुस्लीम समाज ठाकरे गटाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला होता. ईशान्य मुंबई, उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लीम समाजाने महाविकास आघाडीला लक्षणीय प्रमाणात मतं दिली होती. शिवसेना पक्षातील फुटीनंतर नव्याने जोडली गेलेली मुस्लीम समाजाची व्होटबँक ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. मुस्लीम समाजाकडून ठाकरे गटाला पडलेल्या मतांच्या टक्केवारीची भाजपसह महायुतीमधील अन्य पक्षांनीही गंभीर दखल घेतली होती. विधानसभा निवडणुकीतही मुस्लीम समाजाचा पाठिंबा कायम राहिल्यास ठाकरे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील विविध भागांमध्ये शिवसैनिकांकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थी गुणगौरव, रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीर, मोफत अन्नदान यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत ते आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.