मध्य प्रदेश मधील इंदूर शहरात एका महिलेचा दोन भागांमध्ये तुकडे केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतदेहात तिचे हात आणि पायांचे अवयव नव्हते. दोन बॅगमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे ट्रेनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत. त्याबाबतची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.महिलेची हत्या अन्य ठिकाणी करण्यात आली असून शनिवारी रात्री मृतदेह रेल्वेत टाकण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
एका स्वच्छता कर्मचाऱ्याने माहिती दिल्यानंतर, डॉ. आंबेडकर नगर-इंदूर पॅसेंजर ट्रेनमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला, असे सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) स्टेशन प्रभारी संजय शुक्ला यांनी सांगितले.
पीडितेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही, दरम्यान, 20 ते 25 वयोगटातील असल्याचे त्यांनी सांगितले. “महिलेच्या शरीराचा डोक्यापासून कंबरेपर्यंतचा वरचा भाग ट्रेनमध्ये एका ट्रॉली बॅगमध्ये सापडला. तर कमरेखालील शरीराचा भाग प्लास्टिकच्या पिशवीत सापडला होता. तिचे दोन्ही हात आणि पाय गायब आहेत,” रेल्वे पोलिस (जीआरपी) स्टेशन प्रभारी संजय शुक्ला यांनी सांगितले.
या महिलेची एक-दोन दिवसांपूर्वीच अन्य ठिकाणी हत्या करण्यात आल्याचा संशय आहे आणि त्यानंतर शनिवारी रात्री मृतदेह ट्रेनमध्ये ठेवण्यात आला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. डॉ. आंबेडकर नगर-इंदूर ट्रेन शनिवारी रात्री तेथे पोहोचली आणि प्रवासी उतरल्यानंतर ही ट्रेन देखभालीसाठी यार्डमध्ये हलवण्यात आली त्याकाळात मृतदेह रेल्वेत ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, असे ते म्हणाले. महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.