खासदार ओमराजे निंबाळकरांचा मोठा निर्णय आज किंवा उद्या; धाराशिवमध्ये राजकीय भूमिका जाहीर करणार

0
1

धाराशिव : शिवसेना ठाकरे गटातील राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज सायंकाळी किंवा उद्या आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्याहून धाराशिवकडे रवाना होताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीत ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे भावनिक झाले. त्यांनी सांगितले की, “२० वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने जे दुःख सहन केले, त्याच दिवशी पुन्हा मोठा धक्का बसला. कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, मात्र न्यायासाठी हायकोर्टात जाणार आहोत.”

ते पुढे म्हणाले, “माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच वडिलांच्या हत्येमुळे झाली. एका व्यक्तीला संपवून राजकारण संपत नाही, उलट अधिक ताकदीने उभे राहता येते हे दाखवण्यासाठी मी राजकारणात आलो.”

राजकीय भूमिकेबाबत बोलताना ओमराजे म्हणाले, “आज कार्यकर्त्यांशी चर्चा होईल. चर्चा पूर्ण झाल्यास आजच, अन्यथा उद्या निर्णय जाहीर करेन. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. कोण सोबत येणार आणि कोण नाही, हे मी ठरवू शकत नाही.”

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “त्यांच्याबद्दल माझ्याकडून एकही चुकीचा शब्द जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पराभवाबाबत नाराजी व्यक्त करताना ओमराजे म्हणाले की, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरही आमच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर यश मिळाले नाही. मेहनती आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना पराभव स्वीकारावा लागला. ही वस्तुस्थिती चिंतेची आहे.”

ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील निर्णयामुळे धाराशिवसह राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here