
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज रविवार, दि. २१ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भवानी हायस्कूल नजीक असलेल्या आबासाहेब खेबुडकर महाविद्यालयाच्या बास्केटबॉल मैदानावर पार पडणार आहे.
या उपक्रमात युवक, ज्येष्ठ नागरिक, नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी तसेच आटपाडीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.
योग हे निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवनाचे प्रभावी साधन मानले जाते. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. याच उद्देशाने नगरपंचायतीने सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होऊन योगाचे महत्त्व जाणून घ्यावे व आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन आटपाडी नगरपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


