
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले आणि शिवसेनेकडून पंचायत समितीवर निवडून आलेले तृतीयपंथी उमेदवार दिलीप हेगडे यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आटपाडी तालुक्यात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिलीप हेगडे हे विठ्ठलापुर पंचायत समिती गणातून शिवसेनेकडून नुकतेच मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. या विजयामुळे ते तालुक्यातील तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले पंचायत समिती सदस्य ठरले होते. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीमुळे समाजातील वंचित घटकांना नवे बळ मिळाले होते.
राजकीय क्षेत्राबरोबरच दिलीप हेगडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही प्रभावी कामगिरी बजावली होती. ते आवळाई ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच होते. तसेच सरपंच पद रिक्त असल्याने सरपंच पदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपवण्यात आली होती. गावाच्या विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले होते आणि सर्वसामान्यांशी त्यांचा थेट संपर्क कायम होता.
अलीकडेच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी स्वीकारून विजय मिळवला होता. तृतीयपंथी उमेदवार म्हणून मिळालेल्या या यशामुळे त्यांना पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू होती. मात्र नियतीने वेगळाच निर्णय घेत त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
दिलीप हेगडे यांच्या निधनाने केवळ एक लोकप्रतिनिधी नव्हे, तर समाजासाठी झटणारा संवेदनशील नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने आटपाडी तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


