
माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर फोडून करण्यात आलेल्या मोठ्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश व सांगली जिल्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल ३ कोटी २५ लाख ५४ हजार ६०० रुपये किमतीचा सोन्या–चांदीचा ऐवज, रोख रक्कम, वाहन व शस्त्रसाठा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते ०८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.४५ वाजेपूर्वी अज्ञात चोरट्यांनी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या पाठीमागील खिडकीची काच फोडली. त्यानंतर खिडकीचे लोखंडी गज गॅस कटरने कापून बँकेत प्रवेश करत लॉकर रूममधील २२ लॉकर गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्यात आले. लॉकरमध्ये ग्राहकांनी ठेवलेले सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. याबाबत बँकेचे शाखाधिकारी हणमंत धोंडीवा गळवे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
आरोपींनी बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेल्याने तपास अधिक आव्हानात्मक झाला होता. मात्र, घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास, आरोपींच्या ये–जा मार्गांचा शोध व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवण्यात आला. दरम्यान, पलूस येथील एका लॉजवर उत्तर प्रदेशातील काही संशयित इसम वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास केला असता, स्थानिक इसमांच्या मदतीने उत्तर प्रदेशातील आरोपी पलूस परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले.
तपासात असे उघड झाले की, राहुल रंजमीश शर्मा (रा. ककराला, जि. बदायूं, उत्तर प्रदेश) याने सांगली जिल्ह्यातील विश्वजीत विजय पाटील, संकेत अरुण जाधव व इजाज राजु आत्तार यांच्या मदतीने सदर चोरी केली होती. चोरीसाठी लागणारे गॅस कटर, सिलेंडर व इतर साहित्य स्थानिक आरोपींनी पुरविले होते.
त्यानुसार पोलिसांची पथके उत्तर प्रदेश व दिल्ली येथे रवाना करण्यात आली. दि. १९ जानेवारी २०२६ रोजी उत्तर प्रदेशातील ककराला येथे छापा टाकून राहुल शर्मा याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीतील सोन्याची लगड पोलिसांच्या ताब्यात दिली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची ट्रांझिट रिमांड मंजूर केली आहे.
दरम्यान, सांगलीवाडी परिसरात चोरीतील दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. संशयास्पद स्कॉरपिओ वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्या–चांदीचे दागिने, रोख रक्कम, गावठी बनावटीचा कट्टा, चार जिवंत राऊंड, गॅस सिलेंडर व ऑक्सिजन सिलेंडर आढळून आले. यावेळी विश्वजीत विजय पाटील, संकेत अरुण जाधव व इजाज राजु आत्तार यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी झरे येथील बँक लॉकर चोरीची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ कोटी २५ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


