
माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : सत्यशोधक समाजवादी विचारांचे प्रखर प्रवर्तक आणि असंघटित मजुरांसाठी आयुष्य झोकून देणारे नेते बाबा आढाव यांचे 95 व्या वर्षी निधन झाले. एक गाव एक पाणवठा, कष्टाची भाकर, हमाल पंचायत (Hamal Panchayat), अंधश्रद्धाविरोधी लढा, ईव्हीएमविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन यासाठी त्यांना ओळखलं जातं. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष आणि परिवर्तन यांचा प्रवास होय.
कोण होते बाबा आढाव? Who Was Baba Adhav
बाबासाहेब पांडूरंग आढाव म्हणजे बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुण्यात झाला. पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर, पण मनाने पूर्णपणे समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले होते. ते लहान असताना त्यांचे मामा त्यांना राष्ट्र सेवा दलाच्या बैठकींना घेऊन जात. राष्ट्र सेवा दल समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक रचनेत मूलगामी बदल घडविण्याची चळवळ राबवत होते. याच चळवळीने बाबा आढावांच्या विचारांची पायाभरणी केली.
1952 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. धान्याच्या किमती वाढत होत्या, शिधावाटप तुटपुंजे होते. त्याविरोधात बाबा आढावांनी सत्याग्रह केला. हा त्यांच्या सार्वजनिक संघर्षाचा पहिला निर्णायक टप्पा होता. याच काळात त्यांनी बाजारपेठेतील हमालांची दयनीय अवस्था जवळून पाहिली. दिवसभर जीव तोडून काम करणाऱ्या या मजुरांना किमान मजुरी, सुरक्षा, हक्क यापैकी काहीच मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी असंघटीत मजुरांसाठी काम करायचं ठरवलं.
हमाल पंचायतीचे सामाजिक मॉडेल : Hamal Panchayat
कामगार, मजुरांच्या हक्कासाठी बाबा आढाव यांनी 1955 साली हमाल पंचायतीची स्थापना केली. हा असंघटित कामगारांना संघटित करण्याचा मोठा प्रयोग होता. त्या माध्यमातून मजुरांचे शोषण थांबवणे आणि त्यांना न्याय्य कामाचे वातावरण निर्माण करून देणे, समान संधी देणे हा उद्देश होता.
सन 1956 साली हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा उभारला गेला. त्यामुळे मजुरांना किमान वेतन मिळाले आणि हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता मिळाली.
दोन दशकांच्या संघर्षानंतर 1969 साली राज्यात ‘महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि असंघटित कामगार कायदा’ लागू झाला. हा कायदा भारतातील असंघटित मजुरांसाठीचा पहिला संरक्षक कायदा ठरला. या कायद्यामुळे हमालांना सामाजिक सुरक्षा, नियमित मजुरी, कामगार हक्कांची कायदेशीर हमी, संघटनात्मक शक्ती उपलब्ध झाली.
‘कष्टाची भाकर’ योजना : Kastachi Bhakar
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, 2 ऑक्टोबर 1974 रोजी बाबा आढाव यांनी ‘कष्टाची भाकर’ योजना सुरू केली. हमालांना स्वस्तामध्ये पौष्टीक अन्न देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. हमालांच्या कुटुंबांना स्वस्तात अन्नधान्य पुरवणे, महागाईच्या काळात हमाल समूदायाला आधार देणे, श्रमिक कल्याणाचा नवा आदर्श निर्माण करणे अशी कामे त्या माध्यमातून करण्यात आली. ही योजना पुढे महाराष्ट्रातील श्रमिक कल्याण योजनांचे मॉडेल ठरली.
एक गाव, एक पाणवठा : जातिव्यवस्थेवर थेट प्रहार ; Ek Gaan Ek Panvatha
महाराष्ट्रातील जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करत बाबा आढाव यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ सुरू केली. त्या माध्यमातून दलितांना पाण्याचा समान अधिकार मिळवून दिला, सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या आणि त्या माध्यमातून सामाजिक समतेचा ठोस पाया रचला गेला. ग्रामीण समाजातील जातीय भेदभावाला उघडपणे आव्हान देणारी ही चळवळ महाराष्ट्रात अभूतपूर्व ठरली.
भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी बाबा आढाव यांनी केली. बाबा आढाव यांचा लढा हा पूर्णपणे अहिंसात्मक आणि जनआधारित होता. बाबा आढाव हे फक्त एक नेते नव्हते तर ते स्वतः एक संपूर्ण संस्था होते. त्यांच्या निधनाने असंघटित मजूर, कष्टकरी, ग्रामीण वंचित आणि तर्कनिष्ठ चळवळींच्या पथदर्शकाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी पेटवलेला विचारांचा दिवा आणि समाजातील प्रत्येक दुर्बलासाठी आवाज उठवण्याची वृत्ती ही पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे हे मात्र नक्की, अशा या कामगार नेत्याला माणदेश एक्सप्रेसकडून भावपूर्ण श्रद्धांजली!


