युती प्रस्ताव नाकारल्याचा अमरसिंह देशमुखांचा आरोप ; तानाजीराव पाटील यांच्यावर निशाणा

0
1100

माणदेश एक्सप्रेस न्यूज आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जाहीर सभेत अमरसिंह देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “मतदारांनी निश्चित केले आहे की भाजपलाच मतदान करायचे,” असा दावा करत त्यांनी नगरपंचायत निर्मितीपासून आरक्षण वाटपापर्यंत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला.

अमरसिंह देशमुख म्हणाले की, नगरपंचायतीचा विकास आराखडा तयार करताना ९८ टक्के आरक्षणे भाजप कार्यकर्त्यांच्या जागांवर टाकण्यात आली. “आरक्षण करताना एजन्सीला ताब्यात घेत स्वतःच्या मर्जीनुसार आरक्षण वाटप करण्यात आले. काही जण घरात बसून अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रभागाचे आरक्षण ठरवत होते,” असा घणाघात त्यांनी केला. पुढे भाजपची सत्ता आल्यास “आरक्षण प्रभागातील नगरसेवकांच्या सूचनांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल,” असेही ते म्हणाले.

गावच्या परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या मार्किंगविषयीही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “मार्किंगप्रमाणे रस्ता करणे अपेक्षित असताना ‘आमच्या बाजूने ये, मार्किंग पाच फूट पुढे करतो’ असा व्यवहार सुरू आहे,” असा आरोप करत त्यांनी नाव न घेता तानाजीराव पाटील यांना लक्ष्य केले.

तसेच मंत्री जयकुमार गोरे यांना उद्देशून बोलताना देशमुख म्हणाले, “हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी कुठेतरी विचार होणे आवश्यक आहे.” गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता मिळवताना आम्ही एकत्र होतो, मात्र मध्यंतरी मतभेद झाले. “पक्षाने आता त्यावर पडदा टाकला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

यानंतर त्यांनी तानाजीराव पाटील यांच्यावर निशाणा साधत म्हटले, “आमदार-खासदार असल्याचे सांगून दादागिरी करणे योग्य नाही. सत्तेत असताना मोठी स्वप्ने पाहताय; पण भविष्यात तुम्ही काँग्रेससोबतच जाणार आहात.” वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यानुसार आम्ही युतीचा प्रस्ताव दिला होता, परंतु तानाजीराव पाटील यांनी तो नाकारल्याचाही त्यांनी उल्लेख केला. सभेला उपस्थित कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या वक्तव्यांना प्रतिसाद दिला असून निवडणुकीची हवा अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here