
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे (कसबा पेठ)
सामान्य कामासाठी आलेल्या एका इलेक्ट्रिशियनला कुत्र्याच्या धास्तीमुळे आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कसबा पेठ परिसरात घडली आहे. सोसायटीत काम करत असताना कुत्रा मागे लागल्याने घाबरून पळताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मृत इलेक्ट्रिशियनचे नाव रमेश गायकवाड (वय 45) असे असून ते गजानन घोडे यांच्यासोबत 1 ऑक्टोबर रोजी कसबा पेठेतील एका सोसायटीमध्ये कामासाठी आले होते. तिसऱ्या मजल्यावर विद्युत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या सिद्धार्थ कांबळे यांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने अचानक गायकवाड यांच्या मागे धाव घेतली.कुत्र्याच्या भीतीने ते जिन्यावरून वेडेवाकडे पळू लागले. मात्र पळताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते इमारतीच्या डक्टमध्ये धाडकन कोसळले. ही दुर्घटना इतकी गंभीर होती की ते जागेवरच गंभीर जखमी झाले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू
अपघातानंतर सोसायटीतील रहिवाशांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अनेक दिवस उपचार सुरू होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न होता अखेर रमेश गायकवाड यांनी रुग्णालयातच प्राण सोडले. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कुत्रामालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा
कुत्रा पाळताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने ही घटना घडल्याचा ठपका ठेवत फरासखाना पोलीस ठाण्यात कुत्रामालक सिद्धार्थ कांबळे यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.ही घटना कुत्रा पाळणाऱ्या नागरिकांनी योग्य सुरक्षा उपाय न केल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित करते.


