
माणदेश एक्सप्रेस न्युज ; सांगली : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर करण्यात आला आहे. राखीव जागांसाठी निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहेत. सदर सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२५ मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजीची असून अर्जदारांची गैरसोय होऊ नये याकरिता दि. 15 व 16 नोव्हेंबर 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

