विद्युततारेत अडकलेला पतंग काढताना विजेचा धक्का, दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू – भाऊ गंभीर जखमी

0
162

माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोल्हापूर :

उचगाव येथील मंगेश्वर मंदिराच्या मागे बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युततारेत अडकलेला पतंग काढताना धक्का बसून दहावीतील विद्यार्थी सार्थक नीलेश वळकुंजे (वय १६) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ कार्तिक वळकुंजे (वय १४) गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी सुमारास सहा वाजताच्या दरम्यान उचगाव येथील मंगेश्वर मंदिराच्या मागे बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.


 विजेचा जोरदार धक्का आणि मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उडत आलेला पतंग वळकुंजे यांच्या घराजवळील विद्युततारेत अडकला होता. पतंग काढण्यासाठी सार्थक आणि कार्तिक हे दोघे शेजारील बंगल्याच्या गच्चीवर गेले. त्यांनी दहा एमएमएसएमची लोखंडी सळी घेतली आणि पतंग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती सळी उच्चदाबाच्या तारेला स्पर्श होताच सार्थकला विजेचा जबर धक्का बसला, तर कार्तिक गच्चीवरून खाली कोसळला.

घटनेनंतर शेजाऱ्यांनी तत्काळ दोघांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सार्थकला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. त्याचा भाऊ कार्तिक सध्या खासगी रुग्णालयात उपचाराधीन असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.


 शाळेत आणि परिसरात शोककळा

सार्थक हा उचगाव पूर्व येथील न्यू माध्यमिक हायस्कूलमध्ये दहावीचा विद्यार्थी होता. अभ्यासात तो हुशार असून त्याच्या मृत्यूने शिक्षक आणि सहाध्यायींवर शोककळा पसरली आहे. त्याचे वडील मेंढपाळ तर आई गृहिणी आहेत. अचानक झालेल्या या दुर्घटनेने वळकुंजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 पोलिसांची पाहणी

घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. अनिल तनपुरे, पोलिस पाटील स्वप्निल साठे आणि इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून आवश्यक तपास सुरू केला आहे.


 निष्काळजीपणाने घेतला जीव – जनजागृतीची गरज

या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, विद्युत तारेजवळ पतंग उडवणे किंवा अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करणे जीवघेणे ठरू शकते. प्रत्येक वर्षी अशा दुर्घटना घडत असूनही सावधानतेचा अभाव दिसून येतो. या घटनेतून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे.


सार्थक वळकुंजेच्या दुर्दैवी मृत्यूने उचगाव गावात हळहळ व्यक्त केली जात असून, परिसरात शोककळा पसरली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here