
माणदेश एक्सप्रेस न्यूज | अहमदाबाद :
पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारा आणखी एक भयावह गुन्हा गुजरातमध्ये उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांत मुस्कान रस्तोगी (मेरठ) आणि सोनम रघुवंशी (इंदूर) यांनी आपल्या पतीची निर्दयीपणे हत्या करून देशभरात खळबळ उडवली होती. आता असाच गुन्हा गुजरातमधील अहमदाबाद येथे उघड झाला आहे. रुबी नावाच्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आणि मृतदेह घरातल्या किचनमध्ये जमिनीखाली पुरला!
‘दृश्यम’सारखी योजना, पण वास्तवातलं भयावह सत्य
या घटनेचा तपास करताना पोलिसांनाही “दृश्यम” चित्रपटाची आठवण झाली. वर्षभर बेपत्ता असलेल्या ३५ वर्षीय समीर अन्सारी याचा शोध घेत असताना पोलिसांनी जे उघड केलं, ते अंगावर काटा आणणारं आहे.
रुबी आणि समीरमध्ये घरगुती वाद नेहमीच व्हायचे. कारण — रुबीचे तिच्या प्रियकर इमरान सोबत अनैतिक संबंध. या वादातूनच एका भयावह गुन्ह्याचा जन्म झाला.
१४ महिन्यांपासून मोबाईल बंद, कुठलाच ठावठिकाणा नाही
वर्षभर समीरचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. त्याचा मोबाइल तब्बल १४ महिने बंद होता. कुठलाही कॉल, मेसेज किंवा नातेवाईकांशी संपर्क नव्हता. या दरम्यान पोलिसांनी रुबीवर लक्ष ठेवलं, पण ठोस पुरावा मिळत नव्हता.
क्राइम ब्रांचने तपास हातात घेतल्यावर प्रकरणाला वळण मिळालं. अखेर इमरान या प्रियकराला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून भयावह कबुलीजबाब मिळाला.
“आधी बांधलं, मग चाकू भोसकला…”
इमरानने पोलिसांना सांगितलं की, रुबीनेच हत्येची योजना आखली होती. समीर झोपलेला असताना त्याला दोरानं बांधलं. त्यानंतर रुबीने चाकूने भोसकून समीरचा खून केला.
मृतदेह लपवण्यासाठी त्यांनी अत्यंत चलाखीने योजना आखली. मृतदेहाचे तुकडे केले आणि तो घरातील किचनच्या जमिनीखाली पुरला. त्यावर टाइल्स लावून सगळं नेहमीसारखं दिसेल असं केलं.
एक वर्षांनी सापडले अवशेष
पोलिसांनी इमरानच्या कबुलीनंतर अहमदाबादमधील त्या घरात शोधमोहीम राबवली. तेव्हा किचनमधील टाइल्स उखडल्यावर मृतदेहाचे अवशेष आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून रुबी आणि इमरान या दोघांना अटक करण्यात आली आहे.
हा गुन्हा किती नियोजनपूर्वक केला होता हे पाहून तपास अधिकार्यांनाही धक्का बसला आहे.
‘मुस्कान’ आणि ‘सोनम’नंतर आता ‘रुबी’!
देशभरात महिलांनी जोडीदारांची हत्या केल्याच्या सलग घटनांनी नागरिक हैराण झाले आहेत. मेरठच्या मुस्कान रस्तोगीने पतीचा खून करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरून ठेवला होता, तर इंदूरच्या सोनम रघुवंशीने नवऱ्याचा तुकडे करून डिस्पोज केला.
आता अहमदाबादची ही “रुबी” देखील त्या मालिकेतलं पुढचं नाव ठरली आहे — फरक इतकाच, की यावेळी ड्रम नाही… किचनमध्येच पुरला नवरा!
“हा गुन्हा ‘दृश्यम’ चित्रपटासारखा अत्यंत नियोजनपूर्वक केला गेला होता. मात्र शेवटी सत्य उघडकीस आलंच,”
— अहमदाबाद क्राइम ब्रांच अधिकारी.


