मोठी बातमी : एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी; सोनं आणि रोख रक्कम गायब

0
270

माणदेश एक्सप्रेस न्यूज | जळगाव :
राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील निवासस्थानी मध्यरात्री चोरट्यांनी धाड घालत सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता, आणि आता खडसेंच्या घरात चोरी झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


एकनाथ खडसे यांचे जळगावातील शिवरामनगर परिसरात घर आहे. दिवाळी निमित्ताने ते काही दिवसांपासून बाहेरगावी गेले होते. घरात असलेला सुरक्षारक्षकही सुट्टीवर होता. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश करून तळमजला तसेच पहिल्या मजल्यावरील कपाटे उचकली. सकाळी घरकामगार साफसफाईसाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली.


घरातील कपाटे उघडून चोरट्यांनी चार सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या) आणि सुमारे ३५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याचे एकनाथ खडसे यांनी स्वतः सांगितले. तसेच त्यांच्या मुलगा गोपाळ खडसे यांच्या खोलीतूनही पत्नीचे सुमारे सात-आठ तोळे सोनं चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
याशिवाय, रक्षा खडसे यांच्या खोलीतील कपाटे देखील उघडलेली असून तिथेही काही सामान अस्तव्यस्त केले गेले आहे.


घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ञांना बोलावण्यात आले आहे. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याचे स्वतंत्र पथक तपास करत आहे.
पोलिसांनी प्राथमिक चौकशीत सांगितले की, चोरट्यांनी एकूण ८६८ ग्रॅम सोनं आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला नेली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून अद्याप कोणताही ठोस धागा मिळालेला नाही.


या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले,

“रात्री चोरी झाली असावी, पण आम्हाला याची माहिती सकाळी मिळाली. चोरट्यांनी घरातील सर्व रूममध्ये उचकापाचक केली आहे. माझ्या रूममधून चार सोन्याच्या अंगठ्या आणि ३५ हजार रुपये, तर गोपाळच्या रूममधून सात-आठ तोळे सोने चोरीला गेले. वॉचमन सुट्टीवर असल्याने कोणत्या वेळेस चोरी झाली हे सांगता येत नाही. पोलिस तपास करत आहेत.”


या चोरीच्या घटनेपूर्वीच १० ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर तालुक्यात रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. “रक्षा ऑटो फ्युएल्स” या पेट्रोल पंपावर तसेच कर्की आणि तडवेल या ठिकाणांवरील तीन पंपांवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडला होता.
त्या घटनेनंतर खडसे यांनी सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला होता. आणि आता काही दिवसांतच त्यांच्या घरात चोरी होणे हा संयोग की नियोजनबद्ध प्रयत्न, असा सवाल उपस्थित होत आहे.


एकनाथ खडसे यांच्या घरात झालेल्या या चोरीने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. काहीजणांनी पोलिस यंत्रणेच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी खडसे यांच्या विरोधकांकडून हेतुपुरस्सर दबावाचा भाग असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून गुन्हेगारांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.


राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंच्या घरावर झालेली ही चोरी ही केवळ गुन्हेगारी घटना नाही, तर पोलिस सुरक्षा व्यवस्थेलाच दिलेले थेट आव्हान आहे. एका महिन्यात दोनदा खडसे परिवारावर गुन्हेगारांनी हात साफ केल्याने, या प्रकरणाचा तपास जलद आणि काटेकोरपणे होणे आवश्यक ठरत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here