दुचाकी-टेम्पोची भीषण धडक! तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

0
278

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मिरज :
मिरज-टाकळी रस्त्यावर रविवारी दुपारी झालेल्या दुचाकी आणि टेम्पोच्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव इरशाद रियाज मगदूम (वय 34, रा. मुजावर गल्ली, मिरज) असे असून जखमीचे नाव एराब शौकत देसाई (वय 32, रा. मुजावर गल्ली, मिरज) असे आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इरशाद मगदूम हा व्यवसायाने आचारी असून रविवारी दुपारी काम आटोपून आपल्या साथीदारासह दुचाकीवरून टाकळीहून मिरजकडे येत होता. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखालील परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत इरशाद याचा जागीच मृत्यू झाला होता, तर एराब हा गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला आढळला.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी एराब देसाई यास मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त दुचाकी आणि टेम्पो दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.


मृत इरशाद मगदूम हा अत्यंत मेहनती आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याने त्याच्या आकस्मिक मृत्यूने मुजावर गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात धाव घेतली असून वातावरण शोकमग्न झाले आहे.

या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, टेम्पोचालकाविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक वेगाने वाहन चालवत होता, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावरील वाढत्या वाहतूक वेगाबाबत आणि अंधाऱ्या पुलाखालच्या भागात अपघातांची मालिका थांबवण्यासाठी वाहतूक विभागाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here