
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर :
नागपूरमध्ये भर सरकारी कार्यक्रमात दोन महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या धुसफुशीने पोस्ट खात्याची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतच या दोघी उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांमधील वाद सार्वजनिक झाला आणि तो प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला. ‘सरकारी कार्यक्रमात सन्माननीय उपस्थिती, पण वागणूक बाजारातल्या भांडणासारखी’ – अशी चर्चा नागपूरसह राज्यभर सुरू आहे.
शुक्रवारी नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच वेळी मंचावर बसलेल्या पोस्ट खात्यातील दोन वरिष्ठ महिला अधिकारी – पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे आणि नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी – या दोघींमध्ये अचानक तणाव निर्माण झाला.
काही क्षणांतच तो तणाव उफाळून आला आणि उपस्थित सर्वांनी ‘याचि देहि, याचि डोळा’ हा नजारा पाहिला.
एका क्षणी मधाळे यांनी जोशी यांना कोपराने ढकलले, त्यांच्या हाताला चिमटा काढला, साडीवर पाणी सांडले. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेले आणि काही क्षणांतच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या दोघींमधील वादाची पार्श्वभूमी गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे.
८ सप्टेंबर रोजी शोभा मधाळे यांची बदली कर्नाटक राज्यातील घारवाड येथे करण्यात आली.
नवीन नियुक्ती होईपर्यंत नागपूरचा अतिरिक्त प्रभार नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांना देण्यात आला.
मात्र मधाळे यांनी आपल्या बदली आदेशाला न्यायालयात आव्हान दिले आणि स्थगिती मिळवली.
या आदेशामुळे दोघींमध्ये वाद सुरू झाला होता. अखेर हा वाद काल रोजगार मेळाव्याच्या मंचावरच उफाळून आला.
या दृश्यामुळे पोस्ट खात्याचे कर्मचारी अक्षरशः लज्जित झाले.
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे असे वर्तन पाहून काही कर्मचाऱ्यांनी माना खाली घातल्या, तर काहींनी “सरकारी अधिकाऱ्यांचे नवे मनोरंजन!” अशा उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या.
उपस्थित पाहुण्यांनाही हा प्रकार अतिशय अस्वस्थ करणारा ठरला.
या घटनेनंतर दोन्ही अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्याची मागणी होत आहे.
राज्यभरातील पोस्ट विभागातील कर्मचारीही या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत.
“भर कार्यक्रमात, केंद्रीय मंत्र्यांसमोर, सरकारी अधिकाऱ्यांकडून असा बेशिस्त प्रकार होणे हे विभागाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे,” असे मत वरिष्ठांनी व्यक्त केले आहे.
काही कर्मचाऱ्यांनी तर उपहासाने म्हटले –
“त्या दोघींनी सोफा वाटून घ्यावा, पण प्रतिष्ठा वाटू नये!”
कार्यक्रमात घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
नागपूरसह राज्यभर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
“सरकारी महिला अधिकाऱ्यांमधील वाद, तोही गडकरींसमोर!” हे शीर्षक लोकांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पोस्ट विभागाकडून दोघींनाही कारणे दाखवा नोटीस देण्याची शक्यता आहे.
सरकारी मंचावर झालेल्या या ‘रेटारेटीने’ पोस्ट विभागाच्या प्रतिमेवर मोठा डाग पडला आहे, हे मात्र निश्चित.
View this post on Instagram


