कागल उरुसातील थरार — ८० फुटांवर पाळणा अडकला; तब्बल चार तास १८ जणांचा जीव टांगणीला

0
218

माणदेश एक्सप्रेस न्यूज | कागल

कागल : येथे सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुसात घडलेली एक थरारक घटना शनिवारी रात्री सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ठरली. दूधगंगा डेअरीजवळ उभारण्यात आलेला जाॅइंट व्हील नावाचा पाळणा अचानक तांत्रिक कारणामुळे वर जाऊन अडकला. त्या पाळण्यात बसलेले १८ नागरिक तब्बल चार तास सुमारे ८० फुटांवर अडकले होते. अखेर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून मध्यरात्री सर्वांना सुखरूप खाली उतरवले.


शनिवारी सायंकाळी उरुसाच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे पाळण्यांवर मोठी गर्दी होती. सायंकाळी सातच्या सुमारास पाळणा सुरू झाला आणि रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे हा विशाल पाळणा वरच्या स्थितीतच अडकून राहिला.
या पाळण्यात पाच महिला, चार लहान मुले आणि नऊ पुरुष होते. हे सर्व जण कागल, कणेरी मठ आणि गोकुळ शिरगाव परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे.


रात्री अंधार पडल्यावर पाळणा उंचावर अडकलेला पाहून खालील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. वर अडकलेल्या प्रवाशांचा भीतीने अक्षरशः जीव टांगणीला लागला होता.
अडकलेले लोक एकमेकांना धीर देत होते, तर खालील नातेवाईक हातवारे करून धीर देण्याचा प्रयत्न करत होते.
मोबाइल फोनवरील संपर्कामुळे वर-खाली सतत संवाद सुरू राहिला आणि गोंधळ अथवा घबराट पसरण्यापासून परिस्थिती वाचली.


रात्री ११:०० वाजता कोल्हापूर महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी टर्न टेबल लॅडर वाहनाच्या मदतीने एक-एक करून प्रवाशांना खाली उतरवण्याचे काम सुरू केले.
अखेर रात्री १२:३० वाजता सर्व १८ नागरिक सुखरूप खाली आले.
त्या क्षणी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून बचाव पथकाचे अभिनंदन केले आणि सुटकेचा नि:श्वास सोडला.


कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळवले.
पाळणा परिसरात तातडीने सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दरम्यान, उरूस समितीचे पदाधिकारीही घटनास्थळी उपस्थित राहून मदतीला धावले.


हा जाॅइंट व्हील पाळणा गेल्या दोन वर्षांपासून उरुसात येतो.
यामध्ये वर्तुळाकार लोखंडी चक्रावर खुर्च्यांची मांडणी केलेली असते, ज्यावर लोक बसतात.
हे चक्र सुमारे ८० फुटांवर जाऊन फिरते.
शनिवारी रात्री अडकलेला पाळणा यंत्रणेमधील अचानक झालेल्या बिघाडामुळे वर जाऊन थांबला.
पाळणा चालकांनी तासभर प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. अखेर महापालिकेच्या बचाव पथकाची मदत घेण्यात आली.


बचाव मोहिमेदरम्यान प्रवीण काळबर, सौरभ पाटील, दीपक मगर, अमित पिष्टे, विवेक लोटे आदी तरुणांनी घटनास्थळी मदतकार्य केले.
त्यांनी नागरिकांना शांत ठेवत पोलिस आणि अग्निशमन दलास आवश्यक ती मदत केली.


तब्बल चार तास चाललेल्या या थरारानंतर अखेर सर्व १८ नागरिक सुखरूप खाली आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
उरुसातील आनंदाचा माहोल एका क्षणात तणावात बदलला होता, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेने आणि नागरिकांच्या संयमामुळे मोठा अपघात टळला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here