आईसमोर लेकीने सोडले प्राण; दोन दुचाकींच्या भीषण धडकेत दोन ठार

0
355

माणदेश एक्सप्रेस न्यूज | विटा :
विटा-आळसंद मार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात आईसमोरच लेकीने प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. बलवडी (भा.) आणि विटा या दोन गावांमधील तरुण-तरुणींच्या दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


बलवडी (भा.) येथून विट्याकडे येणाऱ्या आणि विट्याहून आळसंदकडे जाणाऱ्या दोन दुचाकींची चक्रधारी सूतगिरणीजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात महेश्वरी आनंदा पाटील (वय २५, रा. मायाक्कानगर, विटा) आणि विनायक दादासाहेब पाटील (वय ३५, रा. बलवडी-भा.) हे दोघे ठार झाले. या अपघातात महेश्वरी यांच्या आई अनिता भगत या किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांच्या डोळ्यांसमोरच लेकीचा मृत्यू झाल्याने त्यांना तीव्र मानसिक धक्का बसला आहे.


घटनेची सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास महेश्वरी पाटील व त्यांची आई अनिता भगत या दुचाकी (क्र. एमएच-१० ईएन-४२८५)वरून विट्याहून आळसंदकडे नातेवाइकांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. तर विनायक पाटील हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच-१२ सीएस-१८६४) आळसंदहून विट्याकडे येत होते. दोन्ही दुचाकींची चक्रधारी सूतगिरणीजवळ समोरासमोर भीषण धडक झाली.


अपघात इतका जबरदस्त होता की दोन्ही दुचाकींचे चक्के उडाले. महेश्वरी आणि विनायक हे दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ तिघांनाही जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच महेश्वरी व विनायक यांनी अखेरचा श्वास घेतला.


या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश्वरी पाटील या स्वभावाने शांत, प्रेमळ आणि कर्तृत्ववान तरुणी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचा अकस्मात मृत्यू विटा परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक ठरला आहे. तर विनायक पाटील हे बलवडी (भा.) गावातील मेहनती व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या. अपघात कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातस्थळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.


या भीषण अपघातानंतर विटा, आळसंद आणि बलवडी परिसरावर शोककळा पसरली असून, सामाजिक माध्यमांवरूनही नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
मुलीच्या मृत्यूने आई कोलमडली असून, रुग्णालयात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.
विटा-आळसंद रस्त्यावरच्या वेगमर्यादा आणि वाहतुकीच्या नियमांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here