
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आपला क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे. “रियाने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केलं, धमकावलं किंवा त्याच्याशी गैरवर्तन केलं” हे सिद्ध होईल असे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत, असं स्पष्ट करत CBI ने तपासाची दिशा संपवली आहे.
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत मुंबईतील वांद्रे येथील घरात मृतावस्थेत आढळले. या घटनेने देशभरात मोठा धक्का बसला होता. सुरुवातीला ही बाब आत्महत्येची म्हणून समोर आली, मात्र चाहत्यांसह अनेकांनी हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला.
CBI ने या वर्षी मार्च महिन्यात दोन क्लोजर रिपोर्ट दाखल केले —
पहिला रिपोर्ट त्या प्रकरणाचा, जो सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटण्यात दाखल केला होता.
दुसरा रिपोर्ट तो, जो रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींविरुद्ध मुंबईत दाखल केला होता.
CBI च्या रिपोर्टनुसार, 8 जून 2020 रोजी रिया आणि तिचा भाऊ शोविक यांनी सुशांतचं घर सोडलं होतं, आणि त्यानंतर 14 जूनपर्यंत त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला नव्हता. दरम्यान सुशांतची बहीण मीतू सिंह 8 ते 12 जूनपर्यंत त्याच्यासोबत होती.
रियावर आर्थिक फसवणूक, मानसिक त्रास, औषधांचा गैरवापर अशा अनेक गंभीर आरोपांचा भडिमार झाला होता. मात्र CBI ने सर्व आरोप पुराव्याअभावी फेटाळले आहेत.
तपासात असेही नमूद करण्यात आले आहे की, जेव्हा रिया सुशांतच्या घरातून निघाली, तेव्हा तिने फक्त स्वतःचा लॅपटॉप आणि घड्याळ नेले होते — या वस्तू स्वतः सुशांतनेच तिला भेट दिल्या होत्या. सुशांतने रियाला आपल्या कुटुंबाचा भाग मानले होते. त्यामुळे तिच्या खर्चाचे हिशेब फसवणूक म्हणून पाहता येत नाहीत, असे CBI ने स्पष्ट केले.
सुशांतचे वडील के. के. सिंह आणि त्यांचे कुटुंब या रिपोर्टवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. “हा रिपोर्ट अर्धवट आहे आणि सत्य दडवण्याचा प्रयत्न झाला आहे,” असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी या रिपोर्टवर पुनर्विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.
CBI च्या या क्लोजर रिपोर्टवर आता पुढील सुनावणी 20 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय सीबीआयचा निष्कर्ष मान्य करायचा की पुन्हा तपास सुरु करायचा, याबाबत निर्णय घेईल.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचल्यानंतर सुशांतने बॉलिवूडमध्ये ‘काय पो चे’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘छिछोरे’ सारख्या चित्रपटांतून स्वतःची ओळख निर्माण केली. त्याच्या अचानक निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली होती. रिया चक्रवर्ती यांच्यावर सार्वजनिक टीकेचा भडिमार झाला आणि त्यांना काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला.
CBI ने सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया व तिच्या कुटुंबीयांना दिलेली क्लीन चिट म्हणजे प्रकरणाचा शेवट की नव्या वादाची सुरुवात, हे येणाऱ्या डिसेंबरमधील सुनावणीत स्पष्ट होईल. मात्र या रिपोर्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा #JusticeForSushant हा हॅशटॅग ट्रेंड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.