
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
राज्यातील निधी वाटपाच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे. विकासाच्या नावाखाली सत्ताधारी पक्ष मतांची खरेदी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “हा प्रकार लोकशाहीचा अपमान आहे. समान न्याय आणि लोकशाहीचा सन्मान करण्याची अपेक्षा करणे म्हणजे गुंडाकडून सदवर्तनाचं प्रवचन ऐकण्यासारखं आहे,” अशी उपरोधिक टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तिखट शब्दांत हल्ला चढवला.
रोहित पवार म्हणाले, “राज्यातील मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे तब्बल ८० हजार कोटी रुपये थकीत आहेत. हे पैसे देण्यासाठी सरकारकडे निधी नाही, पण सत्ताधारी पक्षाच्या ५४ आमदारांना प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्यासाठी मात्र पैसा उपलब्ध आहे. हा प्रकार म्हणजेच ‘विकास निधी’च्या नावाखाली लोकांच्या पैशातून मतांची थेट खरेदी.”
पुढे ते म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा राजकीय जुगाड सुरू आहे. जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करून निधी वाटप होत आहे, हे लोकशाहीच्या मुल्यांवर गदा आणणारे आहे.”
राज्यात निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आधीच संघर्ष पेटला आहे. अशा पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या टीकेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सत्ताधाऱ्यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.