
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | अमरावती :
दिवाळीच्या सणात जिथे सर्वत्र प्रकाश, आनंद आणि सौहार्दाचा माहोल असतो, तिथे अमरावतीच्या राजकारणात मात्र सणाच्या प्रकाशासोबत ‘राजकीय फटाकेबाजी’ही झळकली. स्वाभिमानी नेते बच्चू कडू यांनी जाहीर सभेतून रवी राणा आणि नवनीत राणा या राजकीय जोडप्यावर टीकेचे बॉम्ब फोडत वातावरण तापवले. आरोपांची आतषबाजी करत त्यांनी राणा दाम्पत्यावर आणि सत्ताधारी भाजपवर थेट निशाणा साधला.
जाहिर सभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले,
“भाजपात बायको आणि युवा स्वाभिमान पक्षात नवरा… हे कसल्या प्रकारचं राजकारण आहे? याला कसला स्वाभिमान म्हणायचं? याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही, एवढी नाचक्की झालीय. राणा जोडपं म्हणजे नौटंकीचा उत्तम नमुना आहे.”
कडू यांच्या या वक्तव्यावर सभेत उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ते पुढे म्हणाले,
“तुम्हीच गटार गंगेत उभे राहून राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका करता? आधी स्वतःचं घर नीट सांभाळा आणि मग इतरांवर बोलायला या.”
कडू यांनी राणा दाम्पत्यावर व्यंगात्मक हल्ला चढवत म्हटलं,
“दिवाळीतही राणांना माझी आठवण येते, म्हणजे माझ्याबद्दलचं प्रेम आणि जिव्हाळा किती आहे हे दिसून येतं. राहिले देवधर्म, प्रभू रामचंद्र सोडून दिले आणि माझी आठवण काढतात.”
ते पुढे म्हणाले,
“मी विधान परिषदेसाठी धंदा करत नाही. पण हे लोक राजकारणाला धंदा बनवले आहेत. कधी मशिदीत, कधी मंदिरात, कधी नमाज, तर कधी प्रभू रामचंद्रचं नाव घेऊन राजकारण करतात. हा धंदा थांबवला पाहिजे.”
कडू यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
“राणा दाम्पत्याला वरून कार्यक्रम मिळतो आणि मग ते बच्चू कडूंवर बोलायला लागतात. देवेंद्र फडणवीस यांनीच राणांना बोलावलंय की बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो, ते थांबवलं पाहिजे. म्हणजे हे लोक शेतकरी आणि शेतमजुरांविरोधात काम करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले,
“एक थैली किराणा दिला म्हणजे दिव्यांगांच्या समस्या सुटल्या का? त्यांच्या आयुष्याचं वास्तव तुम्हाला दिसत नाही. आमचं आंदोलन सुरू राहणारच, आणि यानंतर तुम्हाला पूर्ण हिशोब द्यावा लागेल.”
नवनीत राणा यांच्यावर विशेष टीका करताना बच्चू कडू म्हणाले,
“त्या माय माऊलीला माहित नाही मी विधानसभेत किती वेळा शेतकऱ्यांसाठी बोललोय. त्यांना माझ्या भाषणाची कॅसेट पाठवावी लागेल. मी आमदार, मंत्री असताना दिल्लीला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गेलो होतो. पण राणांची मजबुरी आहे; त्यांना वरून आदेश येतात आणि त्यांना बोलावं लागतं.”
शेवटी कडू यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली —
“मी मरेपर्यंत कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेणार नाही. आम्ही आमदार झालो तर स्वतःच्या ताकदीवर. पण राणा दाम्पत्याला राजकारण म्हणजे फक्त धंदा वाटतो. ते वरून कार्यक्रम घेतात, आम्ही लोकांसाठी लढतो. हा फरक लोकांना लक्षात यायला हवा.”
बच्चू कडू यांच्या या जहरी टीकेनंतर अमरावतीत राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. राणा दाम्पत्याकडून यावर प्रतिक्रिया येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिवाळीतल्या फराळासोबतच आता अमरावतीकरांना राजकीय आतषबाजीचा तडका मिळालाय.