
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | अकोला :
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि कुटुंबाच्या सहवासाचा उत्सव. पण अकोल्यात मात्र या आनंदाच्या सणावर काळाने गालबोट लावलं आहे. ऐन दिवाळीच्या रात्री झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरगावमंजू येथील धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट हे पती-पत्नी आपले दैनंदिन काम आटपून कारने घरी परतत होते. त्यांच्या कारमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि गाडी रस्त्यातच बंद पडली. त्यांनी मदतीसाठी मित्रांना फोन केला. काही वेळाने एक मालवाहू वाहन आले आणि बंद पडलेली कार टोचन करून नेत होते.
दरम्यान, कारचे टायर्स तपासण्यासाठी धीरज, अश्विनी, आरिफ खान आणि अन्वर खान हे चौघे जण रस्त्याच्या कडेला उतरले होते. त्या वेळी अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने नियंत्रण सुटल्याने त्यांना जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की चौघेही जागीच रस्त्यावर कोसळले.
या अपघातात धीरज सिरसाट (वय ३५), अश्विनी सिरसाट (वय ३०) आणि आरिफ खान या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
ही घटना अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा गावाजवळ रात्री उशिरा घडली. दिवाळीच्या सणात जेव्हा प्रत्येक घरात आनंद आणि उत्साह होता, तेव्हा या कुटुंबांवर मात्र काळाने प्रचंड घाला घातला. पती-पत्नीचा एकाच वेळी झालेला मृत्यू ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. बोरगावमंजू गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. अकोला ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून महामार्गावरील वेगमर्यादा आणि रस्ते सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रशासनाकडे कारवाईची मागणी करण्यात येत आहे. रस्त्यावर वाहन बिघडल्यास वाहतूक पोलीस किंवा हायवे हेल्पलाइनकडून तत्काळ मदत मिळावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
ज्यांच्या घरात दिवाळीच्या दिवशी फटाके, दिवे आणि आनंदाची चाहूल होती, त्या घरात आता शोकाची सावली पसरली आहे. धीरज आणि अश्विनी या तरुण दांपत्याच्या अकाली मृत्यूने केवळ बोरगावमंजूच नव्हे, तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.