बांधकाम साईटवर निर्दयी हत्या : चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारहाण; चौघांना अटक

0
139

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : 

मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे घडलेल्या एका अमानुष घटनेने परिसर हादरला आहे. चोर असल्याच्या संशयावरून बांधकाम साईटवरील काही मजुरांनी एका २६ वर्षीय तरुणाला बांधून ठेवत निर्दय मारहाण केली. पहाटेपासून सकाळपर्यंत चाललेल्या या मारहाणीमध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास गोरेगाव (पश्चिम) येथील सुभाष नगर परिसरातील तीन डोंगरी भागात, ‘राज पथरोन’ या इमारतीच्या बांधकाम साईटवर घडली. मृत तरुणाचे नाव हर्षल परमार (वय २६) असे असून, तो स्थानिक रहिवासी होता.


हर्षल परमारची आई सुवर्णा रामसिंग परमार यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हर्षल “दारू पिऊन येतो” असे सांगून घरातून बाहेर पडला, मात्र तो रात्रभर परतला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास गोरेगाव पोलिसांचे अधिकारी त्यांच्या घरी आले आणि “तुमच्या मुलाला काही लोकांनी मारहाण केली आहे, तो ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे” अशी माहिती दिली.

सुवर्णा आणि त्यांचे पती रामसिंग परमार घटनास्थळी पोहोचले असता, तिथे उपस्थित काही मजुरांनी “इमारतीत चोरीसाठी आलेल्या व्यक्तींना पकडलं होतं, त्यापैकी एकाला मारहाण केली” असे सांगितले.


इमारतीचा वॉचमन पप्पू दूधनाथ यादव यांनी पोलिसांना सांगितले की, १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या वसंत कुमार प्रसाद नावाच्या मजुराने त्याला सांगितले की, “चार चोरटे इमारतीत घुसले होते. त्यापैकी तिघे पळून गेले, एकाला पकडलं आहे.”

यादव वर गेला असता त्याने पाहिले की काही मजूर एका तरुणाला बांधून ठेवून बांबूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. त्या वेळी त्या तरुणाने आपले नाव हर्षल परमार असल्याचे सांगितले.

यादवच्या म्हणण्यानुसार, सलमान खान हा हर्षलला बांबूने बेदम मारत होता, तर इस्मुल्ला खान लाथाबुक्क्यांनी हल्ला करत होता. यादवने मध्ये पडून थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याला “तुझं काम कर आणि निघून जा” अशी धमकी दिली गेली. भीतीपोटी तो खाली उतरला.


सकाळी सुमारे ७ वाजता यादवने पार्किंग भागात हर्षलला बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. त्याने तातडीने साईट सुपरवायझर प्रदीप मिश्रा यांना कळवले. मिश्रा यांनी पोलिसांना बोलावले आणि तातडीने हर्षलला ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितले की, हर्षलचा मृत्यू आधीच झाला होता.


हर्षलची आई सुवर्णा परमार यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गौतम चमार, राजीव गुप्ता, सलमान खान आणि इस्मुल्ला खान या मजुरांनी हर्षलला चोर समजून बांधून ठेवले आणि पहाटे ३ ते ७ या वेळेत बांबू, लाथा आणि बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण करून त्याचा खून केला.


या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०२ (खून) आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.


या घटनेनंतर गोरेगाव परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. चोर समजून एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव घेणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे, असे सांगत स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here