
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना लक्ष्य करत टोलेबाजी केली. “पूर्वी ‘भाऊबंदकी’ नाटक गाजलं, आता ‘मनोमिलन’ नाटकाचं प्रमोशन सुरू आहे,” अशा शब्दांत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या अलीकडच्या एकत्र येण्यावर उपहास केला.
शिंदे म्हणाले, “राजकारणात आज राजकारण उरलेलं नाही, तर नाट्य मंदिराचा कार्यक्रम सुरू आहे. सगळं काही रंगमंचावर घडतंय, संवादही नाट्यपूर्ण आणि योजना देखील ‘ड्रामा’सारख्या.” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही शिंदेंच्या भाषणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला. “अशोक मामांच्या गाजलेल्या ‘छातीत दुखतंय’ या नाटकासारखंच आता काही लोकांचं ‘पोट दुखतंय’ असं झालं आहे. शिवसेनेच्या यशामुळे त्यांना पचत नाहीये,” असा उपहासात्मक टोला शिंदेंनी लगावला.
त्याच संदर्भात त्यांनी पुढे सांगितले, “या पोटदुखीवर उपाय म्हणून आम्ही ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना’ सुरू केली आहे. मुंबईसह राज्यभरात या दवाखान्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. मात्र तरीही काही विरोधकांची पोटदुखी थांबत नाही. जर त्यांच्याकडे काही जालीम उपाय असतील, तर त्यांनी आम्हालाही सांगावेत,” असा टोला शिंदेंनी मारला.
शिंदेंच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अलीकडील भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा समीकरणांचा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंचे वक्तव्य हे राजकीय सूचकतेने भरलेले असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील “मनोमिलन” हे केवळ नाटक आहे की, भविष्यातील राजकीय आघाडीचा प्रारंभ, हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या या तिखट टिपण्णीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे संबंध, भाजप-शिंदे युतीची रणनीती आणि विरोधकांची भूमिका यावर नवी चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शिंदेंचे वक्तव्य हे केवळ विनोदी नव्हे तर राजकीय संदेश देणारे आहे. ठाकरे बंधूंच्या जवळीकीने आपली शिवसेना (शिंदे गट) अप्रासंगिक ठरू नये, हा संदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
दरम्यान, शिंदे यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनीही चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली असून, पुढील काही दिवस महाराष्ट्रात “मनोमिलन विरुद्ध पोटदुखी” हा नवा राजकीय नाट्यप्रकार रंगणार, असे बोलले जात आहे.