
माणदेश एक्सप्रेस न्यूज | छत्रपती संभाजीनगर
बुद्धगयेतील महाबोधी महाविहार हा जगभरातील बौद्ध धर्मीयांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांना येथेच संबोधी प्राप्त झाली. त्यामुळे ही भूमी बौद्ध धर्मासाठी सर्वोच्च तीर्थक्षेत्र मानली जाते. मात्र, या ऐतिहासिक स्थळावर आजही बौद्धांचा पूर्ण ताबा नसल्याबाबत अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“रामजन्मभूमीप्रमाणे निकष लावून महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली का केला जात नाही? बौद्धांना त्यांच्या स्वतःच्या स्थळावर हक्क सांगताना पुरावे मागितले जातात, पण इतर धर्मीयांना तशी कसोटी का लावली जात नाही?” असा थेट सवाल त्यांनी रविवारी (दि.१९) छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित केला.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आयुष्य धम्मप्रचारासाठी वाहून घेतलेल्या भदन्त करुणानंद थेरो यांच्या महाथेरो विधान समारंभ आणि कठीण चिवरदान धम्मसोहळ्याचे आयोजन नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी देशभरातून हजारो उपासक, उपासिका उपस्थित होते.
आपल्या भाषणात आंबेडकर म्हणाले, “सम्राट अशोकांनी उभारलेला हा महाविहार बौद्धांचाच आहे. ब्रिटिश इतिहासकारांपासून ते चिनी प्रवाशांपर्यंत सर्वांनी बुद्धगयेचा इतिहास नोंदवला आहे. पण जेव्हा आम्ही हक्क सांगतो, तेव्हा पुरावे मागितले जातात. हे दुहेरी धोरण आम्ही सहन करणार नाही.”
आंबेडकर पुढे म्हणाले, “अयोध्येतील रामजन्मभूमीवरील उत्खननात बौद्ध अवशेष सापडले होते. त्या आधारे आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती की रामजन्मभूमी बौद्धांची आहे. पण न्यायालयाने ती याचिका फेटाळून टाकली आणि आमच्या वकिलावर एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. हे पाहून स्पष्ट होते की, या देशात कोणत्या धर्माला न्याय मिळतो आणि कोणत्या धर्माला नाही, हे ठरवलेले आहे.”
आंबेडकरांनी पुढे आवाहन केले की, “प्रत्येक धम्मसोहळ्यात भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसोबत सम्राट अशोकाची प्रतिमाही ठेवली पाहिजे. तसेच सम्राट अशोक जयंतीही तितक्याच थाटामाटात साजरी केली पाहिजे. कारण अशोकानेच बौद्ध धर्माचा जागतिक प्रसार केला.”
आंबेडकर म्हणाले, “देशात धम्मपरिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. आपण ज्या वेगाने पुढे जात आहोत, त्याच वेगाने आपल्याला दाबण्याचाही प्रयत्न होत आहे. भारतीय संविधानाच्या कलम २५ नुसार धर्मांतर हा मूलभूत हक्क आहे. मात्र, धर्मांतर विरोधी कायद्यांच्या माध्यमातून हा घटनात्मक हक्क हिरावला जात आहे. हे लोकशाही आणि संविधानावरचे आघात आहेत.”
धर्म आणि जात या दोन स्वतंत्र ओळखी आहेत, असे सांगून त्यांनी उपस्थितांना आवाहन केले –
“आगामी जातनिहाय जनगणनेत धर्माच्या रकान्यात ‘बौद्ध’ लिहा, पण जातीच्या रकान्यातही तुमची मूळ जात न विसरता लिहा. कारण तुम्ही महार, मातंग, चांभार किंवा इतर कोणत्याही जातीतून बौद्ध धर्म स्वीकारला असल्यास, ते नोंदवणे गरजेचे आहे. तेव्हाच देशात बौद्ध समाजाची खरी संख्या स्पष्ट होईल आणि धम्मक्रांतीला गती मिळेल.”
या प्रसंगी भदन्त शरणानंद महाथेरो, भदन्त डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदन्त बोधीपालो महाथेरो, भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू विशुधानंदबोधी महाथेरो, भदन्त विनयरक्खित महाथेरो, भदन्त सुमनवन्नो महाथेरो, प्रा. डॉ. एम. सत्यपाल, भदन्त एस. प्रज्ञाबोधी महाथेरो, भिक्खू धम्मबोधी महाथेरो यांच्यासह निमंत्रक प्रा. प्रदीप रोडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे, मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, स्मार्टसिटीचे उपायुक्त रविंद्र जोगदंड, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, तसेच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायक पावा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या भव्य सोहळ्याने बुद्ध, आंबेडकर आणि अशोक या त्रिसूत्री आदर्शांच्या प्रेरणेने धम्मचक्राला नवसंजीवनी दिल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.