“महाराष्ट्रात एक कोटी बोगस मतदार!” — राऊतांचा निवडणूक आयोगावर थेट हल्लाबोल

0
34

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई

राज्यातील मतदार यादीतील कथित घोटाळ्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि शिंदे गटावर थेट हल्लाबोल करत, निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. “महाराष्ट्राच्या मतदार यादीत तब्बल एक कोटी बोगस मतदार आहेत. अमित शहांनी घुसखोर शोधायचं काम याच बोगस मतदारांपासून सुरू करावं,” असा थेट सल्ला राऊत यांनी दिला.


“चार दिवसांत साडेसहा लाख मतदार वाढवले — हा कोणता चमत्कार?”

राऊत म्हणाले, “चार दिवसांत साडेसहा लाख मतदार वाढवले हे कसं शक्य आहे? हे मतदार कुठून आले? अमित शाह म्हणतात आम्ही घुसखोरांना शोधून काढू. मग हेच बोगस मतदार घुसखोर नाहीत का? महाराष्ट्रात सध्या एक कोटी बोगस मतदार आहेत, आणि हे मतदार भाजप–शिंदे गटाने घुसवले आहेत. त्यामुळे या घुसखोरांचा शोध तिथूनच घ्या. मतदार यादीतील हा घोटाळा न थांबविल्यास निवडणुका निष्पक्ष होणार नाहीत.

राऊत यांनी पुढे सांगितले की, या संदर्भात १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. “ही केवळ ठाकरे गटाची लढाई नाही, तर महाराष्ट्राच्या लोकशाहीचा प्रश्न आहे,” असेही ते म्हणाले.


“चोरच पुरावा मागतोय!”

राऊत यांनी निवडणूक आयोगालाही थेट लक्ष्य केलं. ते म्हणाले,
“१४-१५ तारखेला आम्ही आयोगाकडे शिष्टमंडळ पाठवलं, पुरावे सादर केले. पण आयोगाकडून कारवाई नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ४६ लाख मतदार वाढले, आणि मतदान एकाच पक्षाला गेलं — हा योगायोग नाही, हा कट आहे.
चोर पुरावा मागतो. ज्या चोराला रंगेहाथ पकडलंय, तोच पुरावा मागतोय! हा चोरच आहे.

राऊत यांनी भाजप आणि निवडणूक आयोगातील साटेलोट्याचा आरोप करत म्हटलं,
“आम्ही आयोगाला प्रश्न विचारतो, पण उत्तर कोण देतो? भाजपचे नेते! मग आयोग स्वतंत्र संस्था आहे का भाजपची शाखा?”


“मराठी लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे”

यावेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला.
“शिंदे यांचं वाचन वाढलं आहे असं दिसतं. त्यांना विचारावं — ‘भाऊबंदकी’ नाटकाचे लेखक कोण? हे नाटक कोणत्या साली आलं? प्रभाकर खाडिलकर यांनी हे नाटक लिहिलंय. पण आजही मराठी समाजात भाऊबंदकी आहे, तोपर्यंत हे राज्य आपलं होणार नाही.
मराठी लोकांनी आता एकत्र यायला हवं, नाहीतर महाराष्ट्र इतरांच्या हाती जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.


“नरकासुरांचा अंत होणारच”

नरकचतुर्दशीच्या निमित्ताने बोलताना राऊतांनी शिंदे गटावर उपरोधिक टीका केली.
“आज नरकचतुर्दशी आहे. नरकासुराचा जन्म गुवाहाटीला झाला. हे नरकासुरही गुवाहाटीला जाऊन पूजा करतात. आज एकनाथ शिंदे यांची जयंती आहे, कदाचित ते गुवाहाटीला जातील. पण त्या नरकासुराचा अंत झाला, त्याचप्रमाणे या गद्दारांचाही अंत जनता नरकासुरासारखाच करेल,” असा घणाघात राऊतांनी केला.


सर्वपक्षीय एकतेचा संदेश

शेवटी राऊत म्हणाले, “हा लढा फक्त शिवसेनेचा नाही. हा महाराष्ट्रातील लोकशाही आणि मतदानाच्या पवित्रतेचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व पक्ष, संघटना, आणि सर्वसामान्यांनी एकत्र येऊन १ नोव्हेंबरच्या मोर्चात सहभागी व्हावं.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here