
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :
शिक्षणाच्या मंदिरात विश्वासघाताची घृणास्पद घटना समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका क्लास चालकाने शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी क्लास चालकास अटक केली असून, त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुरेश दौलत रौंदळ (वय ४६, रा. गौरव राज बिल्डिंग, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) असे असून, तो स्वारगेट भागात खासगी ट्युशन क्लास चालवत होता. रौंदळ हा विवाहित असून, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करतो या नावाखाली तो विद्यार्थ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी पावणेआठच्या सुमारास विद्यार्थिनी शिकवणीसाठी नेहमीप्रमाणे क्लासला आली होती. त्या वेळी वर्गात ती एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी सुरेश रौंदळ याने मुलीशी संवाद साधला.
“तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला आवडतेस. मी स्वतःची शाळा सुरू करणार आहे. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला त्या शाळेत नोकरी देईन. शिवाय तुला सोन्याची रिंग देणार आहे,” असे बोलून त्याने विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन आईवडिलांना सर्व सांगितले. पालकांनी तत्काळ स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी लगेचच कारवाई करत आरोपीला अटक केली.
सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर आणि उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO) तसेच विनयभंग या गंभीर गुन्ह्यांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी रौंदळ याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी क्लासमधील इतर विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू केली असून, आरोपीने अशा प्रकारचे वर्तन पूर्वी केले आहे का, याचा तपास केला जात आहे.
या घटनेनंतर परिसरातील पालकांमध्ये मोठी संतापाची लाट पसरली आहे. शिक्षणाच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या खासगी शिकवणी केंद्रांवर देखरेख ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. मुला-मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अशा क्लास चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.