
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा स्फोटक आरोपांचा पाऊस पाडला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या राजकीय वरदहस्ताने खूनाच्या आरोपात असलेला गुंड निलेश घायावळ देशाबाहेर पळवला गेल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. फक्त एवढंच नव्हे तर, या गुंडाला मिळालेला पासपोर्ट, व्हिसा आणि शस्त्र परवाना यामागे सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचे त्यांनी थेट सांगितले आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले,
“एखाद्या सर्वसामान्य माणसाला पासपोर्ट काढायचा असला तरी अनेक अधिकाऱ्यांना भेटावे लागते. तरीही अनेकदा पासपोर्ट किंवा शस्त्र परवाना मिळत नाही. पण खूनाच्या आरोपात असलेला निलेश घायावळ सहजपणे पासपोर्ट आणि व्हिसा मिळवतो, म्हणजे यामागे राजकीय वरदहस्त आहेच.”
पुढे बोलताना त्यांनी राम शिंदेंवर थेट निशाणा साधला,
“विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी स्वतः निलेश घायावळचा वापर मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी केला होता. विधानसभेच्या प्रचारातही तो शिंदे यांच्या प्रचारात दिसत होता. याचे पुरावे म्हणून व्हिडिओ, फोटो आणि भाषणांचे क्लिप्स आमच्याकडे आहेत,” असा दावा त्यांनी केला.
रोहित पवार म्हणाले,
“या सरकारमध्ये गुंडाशाही फोफावली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा समीर पाटील आणि निलेश घायावळचे निकटचे संबंध आहेत. तसेच हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यासोबतही निलेश घायावळ अधिवेशनात दिसतो. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना किती अधिकार आहेत माहीत नाही, पण राम शिंदे आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा दबाव असल्यामुळेच गुंड सचिन घायावळला शस्त्र परवाना मिळाला असावा.”
“सामान्य नागरिकाला विधानभवनात प्रवेश मिळत नाही, पण हा गुंड अधिवेशनात येतो, व्हिडिओ बनवतो, फोटो काढतो. हे सरकार सामान्य लोकांचे नसून गुंडांचे आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
रोहित पवार यांनी पुढे सांगितले,
“धाराशिव परिसरात पवन चक्क्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तिथे शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी आणि कंपनीला दबावाखाली आणण्यासाठी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वापर केला जातो. नेते स्वतः हे करत नाहीत, पण त्यांच्या वतीने हे लोक ‘काम’ करतात.”
“जर दिवसाढवळ्या गुंडांचा वापर करून राजकारण करणार असाल, तर हे सरकार ‘गुंडांचे सरकार’ आहे असं लोकांना वाटू लागलं आहे,” असेही त्यांनी म्हटले.
या प्रकरणाचा धक्कादायक भाग असा की,
“अहमदाबादवरून निलेश घायावळ लंडनला पळून गेला, आणि त्याचे नातेवाईक त्याला तिथे सोडायला गेले होते. त्यामुळे स्थानिक स्तरावरून त्याला मदत मिळाली असावी,” असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला.
“भूम-परांडा भागात माजी मंत्र्यांच्या कुटुंबीयांसोबत हा गुंड शेतकऱ्यांना धमकावत होता. पोलीस प्रशासनाला वारंवार सांगूनही कारवाई होत नाही. उलट त्यांना संरक्षण दिलं जात आहे,” असंही त्यांनी ताशेरे ओढले.
रोहित पवार यांनी प्रशासनालाही जाब विचारला —
“जे लोक त्रस्त आहेत ते आता पुढे येत आहेत, माहिती देत आहेत. तरीही पोलिसांनी आजवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. या प्रकरणात पोलिसांवरही दबाव आहे का, हा प्रश्न आता जनतेसमोर निर्माण झाला आहे.”
रोहित पवारांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सभापती राम शिंदे आणि त्यांच्या समर्थकांकडून आता या आरोपांवर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, निलेश घायावळच्या पलायनानंतर गुंडांना दिले जाणारे राजकीय संरक्षण आणि प्रशासनाची निष्क्रियता हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरील गंभीर प्रश्न पुन्हा अधोरेखित करत आहे.


