
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने अखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची पुनरागमन झाले आहे. मात्र यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे कर्णधारपदात झाला आहे. बीसीसीआयने वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा याचा कर्णधारपदावरुन पत्ता कट करत तरुण फलंदाज शुबमन गिल याला संघाचे नेतृत्व सोपवले आहे.
टीम इंडियाचे दीर्घकालीन कर्णधार रोहित शर्माला एकदिवसीय मालिकेतून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्याऐवजी तरुण सलामीवीर शुबमन गिलला कर्णधार बनवण्यात आलं आहे. गिलने गेल्या काही महिन्यांतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर निवड समितीचं लक्ष वेधलं होतं.
याशिवाय श्रेयस अय्यरला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी शुबमन गिल उपकर्णधार होता. त्यामुळे आता गिल-श्रेयस या जोडीवर संघाचं नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
चाहत्यांना सर्वाधिक ज्याची प्रतिक्षा होती, ते अखेर घडलं आहे. जवळपास सात महिन्यांनंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत उतरणार आहे. याआधी 9 मार्च रोजी झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताने एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नाही. आता थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत मैदानात उतरणार असून या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं पुनरागमन होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे.
पहिला सामना : रविवार, 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरा सामना : मंगळवार, 23 ऑक्टोबर, एडलेड
तिसरा सामना : शनिवार, 25 ऑक्टोबर, सिडनी
यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे, मात्र त्यासाठीचा संघ वेगळा असेल.
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल.
ही मालिका भारतासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. कारण, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारताने दीर्घ काळापर्यंत वनडे क्रिकेट खेळलेलं नाही. शुबमन गिलसारख्या तरुण खेळाडूवर कर्णधारपदाची मोठी जबाबदारी सोपवून बीसीसीआयने भविष्यातील नेतृत्वाची तयारी सुरु केल्याचं स्पष्ट होत आहे. दुसरीकडे रोहित-विराटसारख्या अनुभवी खेळाडूंची पुनरागमनामुळे संघाला स्थैर्य लाभणार आहे.